PM मोदींचा 'हनुमान' NDA मध्ये सामील होणार; चिराग पासवान लवकरच करणार घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 01:23 PM2023-07-09T13:23:21+5:302023-07-09T13:24:15+5:30
18 जुलै रोही NDA ची मोठी बैठक होत आहे, यात अनेक पक्ष NDA मध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पक्षाची (रामविलास गट) पाटणा येथे मोठी बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुकीची पुढील रणनीती आणि एनडीएमध्ये (NDA) सामील होण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीत पक्षश्रेष्ठींनी युतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार चिराग पासवान यांना दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग पासवान कधीही एनडीएमध्ये सामील होण्याची घोषणा करू शकतात. आतापर्यंत चिराग पासवान आणि त्यांचा पक्ष एनडीएचा अघोषित सहयोगी राहिला आहे, आता ते अधिकृतरित्या एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. पक्षाच्या बैठकीपूर्वी चिराग पासवान यांनी पाटण्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांचीही भेट घेतली. बैठक आटोपल्यानंतर एनडीएसोबत जाण्याबाबत चिराग पासवान म्हणाले की, युतीबाबत चर्चा सुरू आहे, मंत्री होणे हे माझे प्राधान्य नाही. याबाबत आधीच बोलणे युतीच्या धर्मासाठी योग्य नाही.
एनडीएने 18 जुलैला बोलावली बैठक
भारतीय जनता पक्षानेही लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठकही पक्षाने बोलावली आहे. या बैठकीत चिराग पासवानही सहभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत चिराग यांच्याशिवाय महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेसह अनेक पक्ष सहभागी होऊ शकतात. याशिवाय पंजाबमधून शिरोमणी अकाली दल एनडीएमध्ये येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळे झाले होते
नितीश कुमार यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांनी एनडीएशी फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार उभा केला नव्हता. नितीश कुमार यांना सत्तेतून हटवण्यासाठी त्यांनी संपूर्ण निवडणुकीत स्वत:ला पंतप्रधान मोदींचा हनुमान म्हटले होते. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या पक्षातच फूट पडली आणि त्यांचे काका पशुपती पारस(हाजीपूरचे खासदार) यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि एनडीएमध्ये सामील झाले.