Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 07:49 PM2024-09-16T19:49:24+5:302024-09-16T19:56:19+5:30
Chirag Paswan And Narendra Modi : चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या नात्याबद्दलही मोठा खुलासा केला.
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी एका मुलाखतीत त्यांच्या राजकीय प्रवासातील अनुभव शेअर केले आहेत. याच दरम्यान चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या नात्याबद्दलही मोठा खुलासा केला. "पंतप्रधान मोदींसोबतचे माझे संबंध चांगले आहेत. जर मोदी नसते तर कदाचित आज मी कुठेच नसतो आणि माझं पंतप्रधान मोदींसोबत असलेलं नातं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आहे" असं म्हटलं आहे.
"पक्षात झालेल्या काही गोष्टींनंतर पुन्हा सावरणं, स्वत:ला उभं करणं आणि पक्ष सांभाळणं हा एक असा अनुभव आहे जो मी कधीही विसरू शकत नाही. एक काळ असा होता की, माझ्या पक्षात काही गोष्टी घडल्या, पण आता सर्व काही ठीक आहे. त्या कठीण काळात मला आयुष्यातील मोठे अनुभव आले. सरकारचा प्रत्येक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मी आता कोणालाच घाबरत नाही" असं चिराग पासवान यांनी न्यूज18 च्या एका कार्यक्रमात म्हटलं आहे.
जातनिहाय जनगणनेबाबत चिराग पासवान म्हणाले, "हे केलं पाहिजे कारण यामुळे नेमकी संख्या कळेल. जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून योजनांचा लाभ सर्व जातींपर्यंत पोहोचेल. बजेटसाठी देखील जातीची आकडेवारीही खूप महत्त्वाची असते. लोक जनशक्ती पक्ष एनडीएसोबत युती करूनच निवडणूक लढवेल कारण गेल्या विधानसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती" असं बिहार विधानसभा निवडणुकीबाबत म्हटलं आहे.
चिराग पासवान यांनी या संभाषणादरम्यान इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांना लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. लग्नाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, माझं लग्न यावर्षी होणार नाही. तसेच राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. यासोबतच बिहारची आगामी विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार असल्याचं चिराग पासवान यांनी सांगितलं.