पीएम नरेंद्र मोदींचे 'हनुमान' BJP ची साथ सोडणार? चिराग पासवान स्पष्ट बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:20 PM2024-08-30T16:20:33+5:302024-08-30T16:22:34+5:30
Chirag Paswan News : गेल्या अनेक दिवसांपासून चिराग पासवून NDA तून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Chirag Paswan : चिराग पासवान यांच्यासोबत मोठा खेला होणार. पासवान यांच्या पक्षाच्या तीन खासदारांना भाजप आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा आरजेडीचे आमदार मुकेश रोशन यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी(रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान (Chiraj Paswan) NDA मधून फारकत घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. पण, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'हनुमान' चिराग यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला.
VIDEO | Here's what Union Minister and LJP chief Chirag Paswan (@iChiragPaswan) told PTI on reports of fissures between his party and the BJP.
— Press Trust of India (@PTI_News) August 30, 2024
"The confusion being spread by the opposition regarding my party and its MPs is an attempt to fuel conspiracy that was planned in 2021,… pic.twitter.com/siEgUwlrU8
शुक्रवारी(दि.30) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चिराग पासवान यांनी एनडीएमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, विरोधक माझा पक्ष आणि खासदारांबाबत संभ्रम निर्माण करत आहेत. हा गोंधळ म्हणजे, 2021 मध्ये रचलेल्या कटाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न आहे. चिराग पासवानला संपवता येईल असे त्यांना वाटते, पण मला तेव्हाही संपवू शकले नाहीत आणि आताही काही करू शकणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती चिराग यांनी दिली.
चिराग पासवान यांचे विरोधकांवर गंभीर आरोप
चिराग पासवान पुढे म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने पाचही जागा जिंकल्या आहेत. ज्यांना वाटते की, आमच्या पक्षात फूट पडणार आहे, ते फक्त आपल्या इच्छाशक्तीला पंख देत आहेत. त्यांना हवे म्हणून तसे घडणार नाही. विरोधी पक्ष आमच्या सहकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींवरील माझे प्रेम अतूट
वक्फ बोर्ड सुधारणा, लॅटरल एंट्री, क्रिमी लेयर आणि अनुसूचित जातीचे उप-वर्गीकरण या मुद्द्यांवर चिराग पासवान म्हणाले की, माझे विचार नेहमीच सरकारची भूमिका प्रतिबिंबित करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माझे प्रेम अतूट आहे. मी त्यांच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. जोपर्यंत ते पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत असेन. आगामी निवडणुकांच्या प्रश्नावर चिराग म्हणाले की, आमचा पक्ष झारखंडसारख्या राज्यात एनडीएचा सहयोगी म्हणून निवडणूक लढवण्याच्या विरोधात नाही. आमच्या पक्षाची बिहार आणि केंद्रात भाजपसोबत युती आहे, त्यामुळे आम्ही राष्ट्रीय स्तरावर आणि आमच्या गृहराज्यात युती धर्माचे पालन करू. झारखंडमध्ये भाजप आणि एनडीएच्या इतर मित्रपक्षांना आम्हाला सोबत घ्यायचे असेल तर आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.