छोटू भोयर यांचा नासुप्र विश्वस्तपदाचा राजीनामा -- भाग १
By admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:09+5:302015-09-01T21:38:09+5:30
Next
>- इच्छुकांची फिल्डिंग सुरू : नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. छोटू भोयर यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नासुप्रमध्ये महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे हे एकमेव लोकनियुक्त विश्वस्त उरले आहेत. भोयर यांच्या राजीनाम्यानंतर विश्वस्तपदी वर्णी लावण्यासाठी भाजपमध्ये जोरात लॉबिंग सुरू झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा काँग्रेससारखे वातावरण पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. महापालिकेतील प्रतिनिधी म्हणून नासुप्रवर एख विश्वस्त निवडला जातो. २८ नोव्हेंबर २०१२ रोजी डॉ. छोटू भोयर यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळीही पक्षात इच्छुकांची मोठी रांग असल्यामुळे भाजप नेत्यांना निर्णय घेणे जड गेले होते. पण शेवटी भोयर यांनी बाजी मारली. त्यावेळी नाराजांना दिलासा देण्यासाठी भोयर यांची नियुक्ती अडीच वर्षांसाठी असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. भोयर यांची अडीच वर्षे पूर्ण होत आली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले नगरसेवक मुन्ना यादव यांच्या नावाची विश्वस्तपदासाठी चर्चा सुरू झाली. मात्र, काही महिन्यांपूर्वी यादव यांची कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे भोयर कायम राहतील, असे संकेत मानले जात होते. भोयर सुमारे सव्वातीन वर्षे विश्वस्तपदावर कायम राहिले. शेवटी भोयर यांनी २५ ऑगस्ट रोजी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपविला. पक्षनेत्यांनी ३१ ऑगस्ट रोजी नासुप्र सभापतींकडे राजीनामा पाठविला व तो मंजूर करण्यात आल्या. चौकट... सिंगारे उरले एकमेव विश्वस्त - नासुप्रमध्ये आता लोकनियुक्त विश्वस्त म्हणून एकमेव रमेश सिंगारे कार्यरत आहेत. शासनातर्फे नियुक्त करण्यात येत असलेल्या दोन विश्वस्तांची पदे भरलीच गेली नाहीत. आमदारांमधून एक विश्वस्त नेमला जातो. तेही पद रिक्त आहे. आता भोयर यांच्या राजीनाम्यामुळे नगरसेवकांमधून निवडले जाणारे पदही रिक्त झाले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळात आपसातील रस्सीखेच व पक्षांतर्गत मतभेदांमुळे पदे रिक्त ठेवली जात होती. मात्र, आता १५ वर्षानंतर सत्तेत आलेल्या भाजपचीही काँग्रेसच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे दिसते, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.