ख्रिश्चन न्यायाधीशांनी उगारला बंडाचा झेंडा

By admin | Published: April 5, 2015 02:20 AM2015-04-05T02:20:24+5:302015-04-05T02:20:24+5:30

सरन्यायाधीशांनी ठरविलेल्या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयातील दोन ख्रिश्चन न्यायाधीशांनी आक्षेप घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Christian Judges Overturned The Revolt | ख्रिश्चन न्यायाधीशांनी उगारला बंडाचा झेंडा

ख्रिश्चन न्यायाधीशांनी उगारला बंडाचा झेंडा

Next

धर्मनिरपेक्षतेचा वाद : गुड फ्रायडे ते ईस्टर संडेच्या काळात परिषद घेण्यास विरोध
नवी दिल्ली : गुड फ्रायडे ते ईस्टर संडे या ख्रिश्चन धर्मीयांच्या अत्यंत पवित्र पर्वात सुट्यांच्या दिवशी न्यायाधीशांची वार्षिक परिषद आयोजित करण्याच्या सरन्यायाधीशांनी ठरविलेल्या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयातील दोन ख्रिश्चन न्यायाधीशांनी आक्षेप घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि देशभरातील सर्व २४ उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश यांची परिषद शुक्रवारपासून सुरू झाली असून, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिची सांगता होणार आहे.
सरन्यायाधीश न्या.एच.एल. दत्तू यांनी या परिषदेसाठी ३, ४ आणि ५ एप्रिलचे वेळापत्रक ठरविल्यानंतर न्या. विक्रमजीत सेन आणि न्या. कुरियन जोसेफ या सर्वोच्च न्यायालयाच्या दोन ख्रिश्चन न्यायाधीशांनी त्यास आक्षेप घेतल्याचे सूत्रांकडून समजते. यापैकी न्या. जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून आपला विरोध कळविला. एवढेच नव्हे तर न्या. जोसेफ यांनी नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून शनिवारी रात्री पंतप्रधानांकडून न्यायाधीशांसाठी आयोजित केलेल्या भोजन समारंभास आपण का हजर राहणार नाही, याचे सविस्तर विवेचन केले आहे. पंतप्रधानांना १ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्रात न्या. जोसेफ लिहितात, येशू ख्रिस्ताला ज्या दिवशी क्रुसावर चढविले गेले तो गुड फ्रायडेचा दिवस आम्हा ख्रिश्चनांसाठी अत्यंत महत्त्वाचा धार्मिक व पवित्र दिवस आहे. गुड फ्रायडे ते ईस्टर संडे या दिवसांत वडीलधारे आणि कुटुंबीयांसोबत घरी राहून धार्मिक विधी करण्याची आमची प्रथा आहे.
आपल्याला कोणताही धार्मिक रंग द्यायचा नाही, असे नमूद करून न्या. जोसेफ पंतप्रधानांना लिहितात की, धर्म बाजूला ठेवला तरी दिवाळी, होळी, दसरा, ईद, बकरी ईद, ख्रिसमस, ईस्टर हे उत्सव देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जातात व या दिवसांत सुट्ट्या असल्या तरी कोणतेही महत्त्वाचे कार्यक्रम या वेळी आयोजित केले जात नाहीत. या सणांनी आणि उत्सवांनीच भारतीय संस्कृतीची वीण घट्ट विणली गेली आहे. त्यामुळे असे महत्त्वाचे कार्यक्रम ठरविताना सर्वच धर्माच्या सणांची दखल घेतली जावी, अशी विनंती आहे.
सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रातही न्या. जोसेफ यांनी अशाच भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र त्यास सडेतोड शब्दांत उत्तर देताना सरन्यायाधीश न्या. दत्तु यांनी न्या. जोसेफ यांना लिहिले की, मी हे तुम्हाला विचारू शकत नाही. पण आपल्या व्यक्तिगत सोयीला प्राधान्य द्यायचे की संस्थेच्या हिताला हा प्रश्न ज्याने त्याने स्वत:ला विचारायचा आहे. नेहमीच्या न्यायालयीन कामात व्यत्यय येऊ नये यासाठी ही परिषद जोडून आलेल्या तीन सुट्ट्यांच्या दिवशी ठेवली आहे, असे म्हणून सरन्यायाधीशांनी ठरल्या कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. (वृत्तसंस्था)

न्या. जोसेफ हे मूळचे केरळचे असून, तेथील सायरो-मलबार रोमन कॅथॉलिक चर्चचे ते सक्रिय सदस्य आहेत. केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश असताना ‘शालोम टीव्ही’ वाहिनीवर त्यांचा बायबल शिकवणुकीचा कार्यक्रम प्रसारित व्हायचा. त्यात ते बायबलचे एकेक वचन घेऊन निरूपण करायचे.

ख्रिश्चनांनी गुड फ्रायडेच्या दिवशी काम करण्यास काय हरकत आहे? अमेरिकेत तर ९८ टक्के लोक ख्रिश्चन आहेत, पण तेथे हा दिवस कामाचा दिवस असतो. ख्रिश्चन सकाळी चर्चमध्ये प्रार्थना करून कामधंद्याला जाऊ शकतात. भारतात आपल्याला सुटी संस्कृतीने झपाटले आहे.
- न्या. के. टी. थॉमस, निवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय

Web Title: Christian Judges Overturned The Revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.