अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'साठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अतिरेकी संघटना, संघ मात्र राष्ट्रवादी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:03 PM2018-06-15T13:03:50+5:302018-06-15T15:18:20+5:30
'सीआयए'च्या या अहवालावर बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे.
नवी दिल्ली: अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही संघटनांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) मात्र सीआयएने राष्ट्रवादी संघटना म्हटले आहे.
सीआयएकडून 'वर्ल्ड फॅक्टबुक' ही वार्षिक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये इतिहास, लोक, सरकार, अर्थव्यवस्था, उर्जा, भौगोलिकता, संदेशवहन, वाहतूक, लष्कर अशा 267 घटकांचा सद्यस्थितीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला आहे. यामधील राजकीय दबाव आणणाऱ्या संघटना व नेते या विभागात धार्मिक दहशतवादी संघटनांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार काश्मीरमधील हुरियत कॉन्फरन्स या पक्षाला फुटीरतावादी म्हणून संबोधण्यात आले आहे. तर राज्यसभा खासदार मौलाना मेहमूद मदानी यांच्या उलेमा-ए-हिंद या संघटनेला धार्मिक संघटनेचा दर्जा देण्यात आलाय. तर राष्ट्रवादी स्वयंसेवक संघाचा उल्लेख राष्ट्रवादी संघटना असा करण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी RSS चा भाग असणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला मात्र दहशतवादी ठरवण्यात आले आहे.
'सीआयए'च्या या अहवालावर बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे. एखादी गुप्तचर संघटना आमच्या संघटनेला दहशतवादी कशी ठरवू शकते. त्यांनी हा हक्क कुणी दिला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्या जगभरात शाखा आहेत. आम्ही कधी कोणाला त्रासही दिलेला नाही. आमची संघटना राष्ट्रवादाने प्रेरित आहे. 'सीआयए'च्या या अहवालाविषयी काय करायचे याचा निर्णय आम्ही घेऊ, असे बजरंग दलाच्या नेत्यांनी सांगितले.