सव्वासहा लाख मुले रोज ओढतात सिगारेट; तंबाखुजन्य आजाराचे आठवड्याला १७,८८७ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:57 PM2018-03-17T23:57:10+5:302018-03-17T23:57:10+5:30
गेल्या काही वर्षांत तंबाखुचा वापर कमी झाला असला तरी भारतात १० ते १४ वर्षे वयोगटातील सहा लाख २५ हजार मुले दररोज सिगारेट ओढणारी आहेत, असे ग्लोबल टोबॅको अॅटलासने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत तंबाखुचा वापर कमी झाला असला तरी भारतात १० ते १४ वर्षे वयोगटातील सहा लाख २५ हजार मुले दररोज सिगारेट ओढणारी आहेत, असे ग्लोबल टोबॅको अॅटलासने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
दरवर्षी भारतात तंबाखूशी संबंधित आजारांनी ९ लाख ३२ हजार ६०० पेक्षा जास्त लोकांचा बळी जातो. हे प्रमाण आठवड्याला १७,८८७ एवढे आहे, असे अमेरिकन कॅन्सर सोसायटी व अमेरिकेतील व्हायटल स्ट्रॅटेजीजने बनवलेल्या टोबॅको अॅटलासमध्ये म्हटले आहे.
रोज १०३ दशलक्ष प्रौढ (१५ वर्षे आणि त्यापुढील) लोक धुम्रपान करतात आणि त्यांचा त्यावरील खर्च काढला तर तो १,८१८,६९१ दशलक्ष रूपये होतो. या रकमेत आरोग्य व उपचारांवरील प्रत्यक्ष आणि आजारामुळे लवकर होणाऱ्या मृत्युमुळे गमवाव्या लागणाºया उत्पादकतेचा अप्रत्यक्ष खर्च समाविष्ट आहे. मध्यम मानव विकास निर्देशांकातील देशांच्या तुलनेत भारतात फार थोडी मुले धुम्रपान करीत असली तरी ४लाख २९ हजार ५०० पेक्षा जास्त मुले आणि १लाख ९५ हजार ५०० पेक्षा जास्त मुली भारतात रोज धुम्रपान करताना आढळल्या.
दररोज महिलांच्या तुलनेत धुम्रपान करणारे पुरूष जास्त संख्येत आहेत. एकूण ९० दशलक्ष पुरूष आणि १३ दशलक्ष महिला रोज धुम्रपान करतात. १७१ दशलक्ष लोक धूरविरहीत तंबाखुचा (स्मोकलेस टोबॅको) वापर करतात. तोंड आणि घशाच्या कर्करोगाला हीच तंबाखू कारणीभूत आहे.
हृदयविकार तसेच फुफ्फुसाच्या आजारांना व काही विशिष्ट कर्करोगाला मोठ्या प्रमाणावर कारण ठरलेल्या तंबाखुचा वापर कमी व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर जागृतीची अजून गरज आहे, असे मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील वरिष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले.
तंबाखू उत्पादनाचा उद्योग हा खूपच शक्तिशाली असून त्यांची जागतिक बाजारातील शक्ती आणि व्यापक संसाधनांमुळे लहान देशांकडून कारवाईची त्यांना काही भीतीच वाटत नाही, असे अहवालात म्हटले आहे.
81 अब्ज सिगारेट्सचे उत्पादन
२०१६ मध्ये भारतात अंदाजे ८२.१२ अब्ज सिगारेट्सचे उत्पादन झाले. जगातील सहा मोठ्या तंबाखू कंपन्यांचा एकत्रित महसूल ३४६ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त होता. हा महसूल भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५ टक्के एवढा आहे.