माणसे जोडण्याचे सिनेमा प्रभावी माध्यम!
By admin | Published: November 21, 2014 02:23 AM2014-11-21T02:23:47+5:302014-11-21T02:23:47+5:30
विभिन्न भाषा व संस्कृतीचे लोक सिनेमामुळे एकत्र येतात. सिनेमा एक प्रकारे माणसे जोडण्याचेच प्रभावी माध्यम आहे. चित्रपट उद्योगातील लोकांनी हा वारसा असाच पुढे चालवावा
सद्गुरू पाटील, पणजी
विभिन्न भाषा व संस्कृतीचे लोक सिनेमामुळे एकत्र येतात. सिनेमा एक प्रकारे माणसे जोडण्याचेच प्रभावी माध्यम आहे. चित्रपट उद्योगातील लोकांनी हा वारसा असाच पुढे चालवावा, असे आवाहन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केले. ४५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गुरुवारी दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
गोव्यासंबंधीच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ म्हणाले, माझा गोव्याशी खूपच जुना संबंध आहे. माझ्या पहिल्यावहिल्या ‘सात हिंदुस्तानी’ यासह अनेक सिनेमांचे चित्रीकरणही गोव्यातच झाले. गोव्यातील प्रेमळ माणसे, बहुविध संस्कृती, देखणे सागरकिनारे, आल्हाददायी वातावरण मला भावते, असे अमिताभ यांनी नम्रपणे नमूद केले. गोव्याला ‘इफ्फी’चे कायमस्वरूपी केंद्र बनविल्याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. सिनेसृष्टीतील आमच्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेतल्याशिवाय आम्ही नवा इतिहास निर्माण करू शकत नाही, असे सांगत त्यांनी वडील स्व. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘कोशिश करनेवालों की हार नही होती,’ या कवितेच्या काही पंक्ती उद्धृत केल्या.
सिनेसृष्टीतील योगदानाबाबत दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांना अमिताभ आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ‘सेंटेनरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. गोव्यात आपण ‘इफ्फी’साठी पहिल्यांदाच आलो. पुरस्काराबद्दल रजनीकांत यांनी आनंद व्यक्त केला. ‘इफ्फी’त दरवर्षी नवनव्या सुविधा निर्माण होतील, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. पुढील ‘इफ्फी’त आणखी सुविधा पुरवल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.