हिंदीची सक्ती करणारे परिपत्रक दक्षिण रेल्वेकडून रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 07:04 AM2019-06-15T07:04:56+5:302019-06-15T07:05:27+5:30
प्रादेशिक भाषांना मनाई : तामिळनाडूत द्रमुकच्या निदर्शनानंतर रेल्वे खात्याने उचलले पाऊल
चेन्नई : कार्यालयीन कामकाजासाठी प्रादेशिक भाषांऐवजी फक्त इंग्लिश व हिंदीचा वापर करावा, असे दक्षिण रेल्वेचे परित्रक अखेर तामिळनाडूच्या विरोधानंतर मागे घेण्यात आले. रेल्वेस्थानकातील कर्मचारी व रेल्वे वाहतूक नियंत्रकांवर या परिपत्रकाद्वारे हिंदी व इंग्रजीची सक्ती करण्यात आली होती. द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी त्याविरोधात शुक्रवारी जोरदार निदर्शन केली. बुधवारी जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात म्हटले होते की, कामकाजामध्ये कोणत्याही त्रुटी व विसंवाद राहू नये म्हणून हिंदी व इंग्लिश भाषेचा वापर
करावा.
रेल्वे वाहतूक नियंत्रक व मुख्य कार्यालयामधील संवादामध्ये सुधारणा व्हावी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते. दक्षिण भारतामध्ये हिंदी भाषेला प्रचंड विरोध आहे. या परिपत्रकामुळे संतप्त झालेल्या द्रमुक कार्यकर्त्यांनी दक्षिण रेल्वे मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. खासदार दयानिधी मारन यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने दक्षिण रेल्वेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन निषेध केला. त्यानंतर दक्षिण रेल्वेने हे परिपत्रक रद्द केल्याचे जाहीर केले आहे. द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलीन म्हणाले होते की, तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचाच नव्हे, तर या भाषेचे वर्चस्व निर्माण व्हावे हा दक्षिण रेल्वेचा हेतू आहे. त्यासाठी उद्धट भाषेत परिपत्रक काढण्यात आले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे अधिकाऱ्यांना धमकाविले जात आहे. हा प्रयत्न हाणून पाडला जाईल. तामिळनाडूवर हिंदीची सक्ती करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने आता बंद करावेत. तसे न झाल्यास द्रमुक हिंदीवर कायमची बंदी घालेल. (वृत्तसंस्था)
शाळांतही विरोध
च्केंद्र सरकारने अलीकडेच शाळांमध्ये तीन भाषा प्रणालीचा प्रस्ताव मांडल्यापासून तामिळनाडूमध्ये हिंदीला असलेला विरोध पुन्हा उफाळून आला आहे.
च्या प्रस्तावात शालेय भाषा, मातृभाषा व तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली होती.
च्त्याला तामिळनाडूत प्रचंड विरोध झाल्यानंतर हिंदी भाषेची सक्ती करण्याचा कोणताही विचार नाही, अशी सारवासारव केंद्राने केली होती.
च्बीएसएनएल, टपाल कार्यालये, रेल्वेस्थानकांच्या कार्यालयांवरील हिंदी फलकांवरही काळे फासण्यात आले होते.