सुट्टी नाकारल्याने CISF जवानाने अधिका-यांवर झाडल्या गोळ्या
By admin | Published: January 13, 2017 10:13 AM2017-01-13T10:13:07+5:302017-01-13T10:13:07+5:30
सुट्टी नाकारली म्हणून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 13 - निमलष्करी दलातील जवानांनी आपल्याला मिळणा-या असुविधा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या असताना दुसरीकडे सुट्टी नाकारली म्हणून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चारपैकी दोघे जवान जागीच ठार झाले, तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात हा प्रकार घडला. मृतांत एक सहायक फौजदार आणि तीन हवालदारांचा समावेश आहे.
बिहारमधील एका औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) बलवीरसिंग या जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याने एकच खळबळ माजली. तो उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील रहिवासी आहे. नवीननगर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडच्या येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात आहेत.
'रजेच्या मुद्द्यावरून सहकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर, बलवीरसिंग याचा स्वत:वरील ताबा सुटला आणि त्याने सहकाऱ्यांवर गोळीबार केला', असे पोलीस अधीक्षक डॉ. सत्यप्रकाश यांनी सांगितले. 'रजा मिळत नसल्याने बलवीरसिंग नाराज होता. पण कोणत्याही प्रश्नांची सरळ उत्तरे देत नव्हता', असंही त्यांनी सांगितलं आहे.
बलवीरने सर्व्हिस रायफलमधून सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यात दोन जण जागीच ठार झाले, तर दोघांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे ते मरण पावले. रात्री साडेबारा वाजता एका गटाची पाळी संपून दुसऱ्या गटाची पाळी सुरू होत असताना ही घटना घडली.
बलबीरने चौघांवर गोळ्या झाडल्यानंतर उर्वरित सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. बरवीरसिंग दोन महिन्यांच्या योग प्रशिक्षणानंतर नुकताच कामावर परतला होता. त्याच्या रजेबाबत काही तक्रारी होत्या, असे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.