दिल्ली विमानतळाची सुरक्षा सर्वोत्तम, जागतिक संस्थेकडून CISF चं कौतुक
By admin | Published: July 3, 2017 12:10 PM2017-07-03T12:10:41+5:302017-07-03T12:14:26+5:30
दिल्ली विमानतळाची सुरक्षा लॉज एंजेलिस, दुबई आणि पॅरिसमधील विमानतळांपेक्षाही उत्तम आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) पुरवण्यात येणारी सुरक्षा जगातील सर्वोत्तम सुरक्षा आहे. वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने सीआयएसएफला प्रमाणपत्र दिलं असून लवकरच त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल सीआयएसएफने राखलेला दर्जा सर्वोत्तम असून वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून त्यांची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वतंत्रपणे कार्यरत असणा-या वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने आतापर्यंत खासगी क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांना कामांचा दर्जा पाहता सन्मानित केलं आहे. 6 जुलै रोजी वार्षिक कार्यक्रमात सीआयएसएफला अवॉर्ड देत सन्मानित करण्यात येणार आहे.
दिल्ली विमानतळावरुन दरवर्षी किमान 56 दशलक्ष प्रवासी प्रवास करत असतात. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेने विमानतळ सर्व्हिस रेटिंगमध्ये दिल्ली विमानतळाचा दर्जा उत्तम असल्याचं सांगितलं होतं. दिल्ली विमानतळाची सुरक्षा लॉज एंजेलिस, दुबई आणि पॅरिसमधील विमानतळांपेक्षाही उत्तम असल्याची नोंद यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच आता वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून सीआयएसफचं कौतुक करण्यात आलं आहे. यानिमित्ताने अजून एक मानाचा तुरा दिल्ली विमानतळ आणि सीआयएसफच्या शिरपेचात रोवला जाणार आहे.
सीआयएसएफचे महासंचालक ओ पी सिंह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "सेवा आणि सुरक्षेच्या बाबतीत जवानांनी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. विमानतळावर रोज हजारो प्रवाशांचा सामना करताना, धोक्यांची काळजी घेत असताना जवानांनी नेहमीच आपल्यातील नेतृत्वगुण दाखवत उत्तम कामगिरी केली आहे".
दिल्ली विमानतळावर रोज 4000 सीआयएसएफ जवान दिवसरात्र सुरक्षेसाठी तैनात असतात. "सुरक्षेसाठी तैनात जवानांना अनेकदा जेवण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठीही वेळ नाही मिळत. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी ते सतत तत्पर असताता", असं एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे.
दिल्लीसह मुबई, चेन्नई आणि कोलकाता विमानतळ संवेदनशील असून नेहमी रडारवर असतात. दहशतवादी कारवाया करण्यासाठी नेहमीच या विमानतळांना टार्गेट केलं जातं. त्यामुळे यांची सुरक्षा जास्त महत्वाची असते.