CAA: रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला; राज्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 09:22 PM2019-12-17T21:22:20+5:302019-12-17T21:38:19+5:30
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांच्या प्रशासनाला सूचना
नवी दिल्ली: सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी रेल्वे प्रशासनाला कठोर आदेश दिले आहेत. आंदोलनादरम्यान कोणीही रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करत असल्यास त्याला जागेवरच गोळ्या घालण्याच्या सूचना आंगडींनी दिल्या आहेत.
जर कोणीही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करताना दिसला, तर त्याला त्याच क्षणी गोळ्या घाला, असे आदेश जिल्हा आणि रेल्वे प्रशासनाला दिल्याची माहिती आंगडी यांनी दिली. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान पश्चिम बंगालसह इतर अनेक राज्यांमध्ये आंदोलकांनी रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान केल्याबद्दल आंगडी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना आंगडी यांनी प्रशासनाला सूचना दिल्याचं सांगितलं.
#WATCH Union Min of State of Railways, Suresh Angadi speaks on damage to properties. Says "...I strictly warn concerned dist admn&railway authorities, if anybody destroys public property, including railway, I direct as a Minister, shoot them at sight..." #CitizenshipAmendmentActpic.twitter.com/VeUpZY7AjX
— ANI (@ANI) December 17, 2019
रेल्वे सर्वसामान्य जनतेनं भरलेल्या कररुपी पैशांवर चालते आणि एक ट्रेन तयार करायला अनेक वर्षे लागतात, असं आंगडी म्हणाले. कोणीही दगडफेक केल्यास वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणे कठोर कारवाई व्हायला हवी. काही स्थानिक अल्पसंख्यांक आणि समुदाय कारण नसताना देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं राज्यमंत्री आंगडी यांनी म्हटलं. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेच्या पूर्व विभागानं १९ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.