बालाकोट एअरस्ट्राइकवर प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार- हमीद अन्सारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 09:29 AM2019-04-24T09:29:36+5:302019-04-24T09:30:55+5:30

देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी बालाकोट एअर स्ट्राइकवर नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

citizens have right to question balakot air strikes says former vice president hamid ansari | बालाकोट एअरस्ट्राइकवर प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार- हमीद अन्सारी

बालाकोट एअरस्ट्राइकवर प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार- हमीद अन्सारी

Next

नवी दिल्ली- देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी बालाकोट एअर स्ट्राइकवर नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. बालाकोट एअरस्ट्राइक का करण्यात आलं आणि त्याचा देशाला कोणता फायदा झाला, असे प्रश्न लोक विचारू शकतात. सरकारनंही या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. एका माध्यम प्रतिनिधीशी बातचीत करताना त्यांनी हे विधान केलं आहे. मुलाखतीदरम्यान हमीद अन्सारींनी नागरिकांच्या काही मूलभूत अधिकारांबाबतही आवाज उठवला. देशाचं परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेशी संबंधित असलेल्या गोष्टींवर प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.

अन्सारी म्हणाले, तुम्ही कोणतेही पुरावे लपवू शकत नाही. भारतानं पाकिस्तानचं एफ 16 विमान पाडल्याचा दावा फेटाळल्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, जर मी दावा करत आहे की वाघाला मारलं, तर मला मारलेला वाघ दाखवावा लागेल. तसेच अन्सारी यांनी मोदींवरही टीका केली आहे. मोदींनी सुरुवात जोरात केली होती, परंतु जनतेला दिलेली आश्वासनं त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुस्लिम असुरक्षित असल्याचंही म्हटलं होतं. देशातील मुस्लिमांमध्ये अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षततेची भावना असल्याचं वक्तव्य हमीद अन्सारी यांनी केलं होतं. देशात असहिष्णुता आणि स्वयंघोषित गोरक्षकांकडून होणा-या हल्ल्यांच्या घटना समोर येत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

राज्यसभा टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना केलेल्या या विधानातून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर एक प्रकारे टीकाच केली होती.  हमीद अन्सारी यांनी सांगितलं होतं की, 'असहिष्णुतेचा मुद्दा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहका-यांसमोर उपस्थित केला आहे'. देशातील नागरिकांच्या राष्ट्रीयत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अत्यंत विचलित करणारं असल्याचंही ते बोलले आहेत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपला कार्यकाळ संपत असतानाच असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Web Title: citizens have right to question balakot air strikes says former vice president hamid ansari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.