मास्क न घातल्यास १ लाख रुपये दंड, नागरिकांनी विरोध करत पुकारला बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 08:20 PM2020-07-24T20:20:20+5:302020-07-24T20:21:29+5:30
जमशेदपूरमधील एससीसीआयचे अध्यक्ष अशोक भलोटीया यांनी शनिवारी जमशेदपूरमध्ये सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद पुकारण्यात येत असल्याचे म्हटले.
जमशेदपूर - झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, लॉकडाऊनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन सोरेन यांच्याकडून करण्यात आलं. मात्र, राज्य सरकारच्या काही नियमांविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, झारखंडमधीलजमशेदपूरमध्ये शनिवारी बंद पाळण्यात येणार आहे. मास्क परिधान न करणाऱ्यांना 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्षांची शिक्षा हा नियम रद्द करण्याची मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.
जमशेदपूरमधील एससीसीआयचे अध्यक्ष अशोक भलोटीया यांनी शनिवारी जमशेदपूरमध्ये सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद पुकारण्यात येत असल्याचे म्हटले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी कडक नियमावली लावली पाहिजे, या उपाययोजनांना आमचा विरोध नाही. मात्र, सरकारने नवीन अध्यादेशानुसार 1 लाख दंड आणि 2 वर्षांच्या शिक्षेची केलेली तरतूद तत्काळ रद्द करावी अशी आमची मागणी असल्याचे भलोटीया यांनी म्हटलंय. कारण, सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार असून भ्रष्टाचार वाढीस लागणार आहे. तसेच, हा निर्णय प्रॅक्टीकली शक्य नसल्याचेही भलोटीया यांनी म्हटले.
झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, लॉकडाऊनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन सोरेन यांच्याकडून करण्यात आलं. तसेच, राज्यातील सर्वच नागरिकांना मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीने लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास अथवा मास्क परिधान न केल्यास 2 वर्षांची शिक्षा करण्यात येणार आहे. तर, मास्क न परिधान करणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचा दंडही करण्यात येणार आहे. झारखंड संक्रमण रोग अध्यादेशानुसार यास कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध नागरिकांनी बंद पाळून आपला विरोध व्यक्त केला.
दरम्यान देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अद्यापही पुढील काही काळ मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टन्स हे गरजेचं असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच, केंद्र आणि सर्वच राज्यांच्या राज्य सरकारने मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. लॉकडाऊन आणि कोरोना रोगाचा प्रसार वाढ नये, यासाठी काळजी म्हणून नियमांचे कडेकोट पालन करण्याचे सरकारने बजावले आहे. त्याच पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत.