Citizenship Amendment Bill: शिवसेनेचा 'सेफ गेम'; भाजपासाठी सोपा झाला आकड्यांचा खेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 09:19 PM2019-12-11T21:19:08+5:302019-12-11T21:38:59+5:30
शिवसेनेच्या खेळीमुळे भाजपाला अप्रत्यक्ष मदत; नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन वारंवार भूमिका बदलणारी शिवसेना राज्यसभेत नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकावर आज राज्यसभेत मतदान झालं. या मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र याचा अप्रत्यक्ष फायदा सत्ताधारी भाजपाला झाला. शिवसेनेच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यानं बहुमताचा आकडा खाली आला. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं १२५, तर विरोधात १०५ खासदारांनी मतदान केलं. याआधी शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला होता. तर सामनामधून विधेयकावर जोरदार टीका केली होती.
नागरिकत्व सुधारणा विधेयकावर परवा लोकसभेत मतदान झालं. त्यावेळी ३११ खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. तर ८० सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. विशेष म्हणजे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलेल्या शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याआधी सोमवारी शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून नागरिकत्व सुधारणा विधेयकावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेनं अनेकांना धक्का बसला.
लोकसभेत शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूनं मतदान करताच काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. यानंतर शिवसेनेचा सूर काहीसा बदलला. विधेयकाबद्दल संभ्रम असून जोपर्यंत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचं निरसन होत नाही, तोपर्यंत विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं विधान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. यानंतर आज राज्यसभेतील चर्चेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधेयकाबद्दल प्रश्न उपस्थित केले. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नयेत, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यामुळे शिवसेना राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान करेल, अशी चर्चा होती. मात्र राजकीय गोची झालेल्या शिवसेनेनं अखेर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपाला अप्रत्यक्ष मदत झाली.