Citizenship Amendment Bill: लोकसभेत पाठिंबा, राज्यसभेत बहिष्कार; सेनेच्या बदललेल्या भूमिकेबद्दल राऊत म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:12 PM2019-12-11T22:12:43+5:302019-12-11T22:13:30+5:30
राज्यसभेत वादळी चर्चेनंतर अखेर नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे.
राज्यसभेत वादळी चर्चेनंतर अखेर नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे. विशेष म्हणजे या राज्यसभेत शिवसेनेच्या भूमिकेकडेच सर्वांच लक्ष होतं. विधेयकांवर राज्यसभेत चर्चा सुरू झाल्यावर सुरुवातीला संजय राऊतांनी शाहांना टोले लगावले होते, त्यानंतर शिवसेनेनं सभात्याग केल्यानं भाजपासाठी एक प्रकारे मैदान मोकळं करून दिलं. त्यानंतर शिवसेनेनं केलेल्या सभात्यासंदर्भात राऊतांना विचारले असता, त्यांनी शिवसेना कोणतीही भूमिका घेण्यासाठी स्वतंत्र असल्याचं सांगितलं आहे. आम्ही स्वतंत्र राजकीय पक्ष आहोत. आपली स्वतःची वेगळी भूमिका आहे. आमच्या भूमिकेचा महाविकास आघाडीच्या सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.
Sanjay Raut, Shiv Sena when asked if Shiv Sena's stand over #CitizenshipAmendmentBill2019 will affect 'Maha Vikas Aghadi' govt in Maharashtra: What effect will it have? We have kept forth our view. We are an independent political party. We have our own role. pic.twitter.com/26LwZ64KLh
— ANI (@ANI) December 11, 2019
तत्पूर्वी नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन वारंवार भूमिका बदलणारी शिवसेना राज्यसभेत नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकावर आज राज्यसभेत मतदान झालं. या मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र याचा अप्रत्यक्ष फायदा सत्ताधारी भाजपाला झाला. शिवसेनेच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यानं बहुमताचा आकडा खाली आला. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं 125, तर विरोधात 105 खासदारांनी मतदान केलं. याआधी शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला होता. तर सामनामधून विधेयकावर जोरदार टीका केली होती.