भारताच्या परवानगीनेच चोकसीला नागरिकत्व; अँटिग्वाचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 12:54 AM2018-08-04T00:54:03+5:302018-08-04T00:54:21+5:30
मुंबई पोलीस आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतरच मेहुल चोकसी याला आपण नागरिकत्व दिले, असा गौप्यस्फोट अँटिग्वा सरकारने केला आहे.
नवी दिल्ली : मुंबई पोलीस आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतरच मेहुल चोकसी याला आपण नागरिकत्व दिले, असा गौप्यस्फोट अँटिग्वा सरकारने केला आहे.
पंजाब नॅशलन बँकेतील १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील एक आरोपी असलेला मेहुल चोकसी देशाबाहेर पळून गेल्यानंतर त्याला कॅरेबियन देश अँटिग्वाने नागरिकत्व दिले आहे. त्यावरून वाद सुरू आहे. याप्रकरणी अँटिग्वाने एक निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली. अँटिग्वाने म्हटले की, नागरिकत्व देण्यापूर्वी चोकसीची आवश्यक ती सर्व पार्श्वभूमी तपासण्यात आली. त्याच्याविरुद्ध सेबीने दोन वेळा चौकशी केल्याचे आढळून आले. तथापि, ही प्रकरणे आता बंद करण्यात आल्याचे सेबीने आम्हाला कळविले.
अँटिग्वाच्या सिटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट युनिटने (सीआययू) म्हटले की, चोकसीच्या नागरिकत्वासाठी भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, मुंबईत विभागीय पासपोर्ट कार्यालय व मुंबई पोलीस यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले. या सर्व संस्थांनी चोकसीविरुद्ध कोणताही प्रतिकूल शेरा दिला नाही. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच त्याला अँटिग्वा आणि बरबुडाचे नागरिकत्व देण्यात आले.
सीआययूचे निवदेन ‘अँटिग्वा आॅब्झरवर’ या दैनिकाने आपल्या वेबसाईटवर पोस्ट केले आहे. त्यात म्हटले आहे की, भारत सरकार आणि भारतातील सर्व आवश्यक तपास संस्थांकडून तर चोकसीची माहिती घेण्यात आलीच; पण इंटरपोल व थॉम्पसन रॉयटर्स वर्ल्ड-चेकसारख्या तिसऱ्या पक्षाकडूनही चौकशी करण्यात आली. सर्वांनी अनुकूल अहवाल दिल्यानंतरच चोकसीला नागरिकत्व देण्यात आले.
कोणतीही माहिती दिली नाही - सेबी
चोकसीबाबत अॅन्टीग्वा सरकारला कुठलाही सकारात्मक अहवाल किंवा त्याच्याविरोधातील चौकशीसंबंधी कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही, असा खुलासा ‘सेबी’ने केला आहे. अॅन्टीग्वाच्या सीआययू विभागाने नागरिकत्व देण्याआधी ‘सेबी’कडे विचारणा केली होती. त्यावर चोकसीसंबंधी दोन प्रकरणांची चौकशी करुन ती प्रकरणे समाधानकारकरित्या बंद करण्यात आल्याचे ‘सेबी’ने कळविल्याचे अॅन्टीग्वा सरकारचे म्हणणे आहे.
प्रमाणपत्र नेमके दिले कोणी?
मुंबई : चोक्सीबाबत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने दिलेल्या चारित्र्य प्रमाणपत्रानुसार आम्ही कार्यवाही केली. त्यामुळे यात पासपोर्ट कार्यालयाचा काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण पासपोर्ट कार्यालयाने दिले आहे. मात्र विशेष शाखेने आपल्याकडून असे कुठल्याच स्वरूपाचे प्रमाणपत्र दिले नसल्याचा दावा केला आहे. २०१६ पासून आतापर्यंतचा तपशील तपासण्यात आला आहे. त्यात या व्यक्तीच्या नावाने कुठलेच प्रमाणपत्र दिल्याचे दिसून आले नसल्याचे विशेष शाखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.