शहरात १२, तर उपनगरात ३७ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: September 26, 2014 02:09 AM2014-09-26T02:09:04+5:302014-09-26T02:09:04+5:30
घटस्थापनेचा मुहूर्त साधत गुरूवारी मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघातून १२ तर उपनगर जिल्हयातल्या २६ विधानसभा मतदार संघातून गुरुवारी एकूण ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल
मुंबई : घटस्थापनेचा मुहूर्त साधत गुरूवारी मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघातून १२ तर उपनगर जिल्हयातल्या २६ विधानसभा मतदार संघातून गुरुवारी एकूण ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
मुंबई शहरात बुधवारपर्यंत केवळ ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र आज एकूण ११ उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. कालिदास कोळंबकर यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शहरातून आत्तापर्यंत एकूण १६ अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
शनिवारी आणि सोमवारी शहरातून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. मंगळवारी शिवडी विधानसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत देसाई आणि मलबार हिलमधून शंकर सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत शहरातून उमेदवारांचे खाते उघडले. बुधवारी शीव-कोळीवाडा येथून प्रकाश विजयसिंह, मलबार हिलमधून शंकर सोनावणे आणि मुंबादेवीतून अब्दुल लतीफ अहमद कादीर शेख व मतीन अहमद रंगरेज या अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर आज गुरूवारी माहिम, वरळी, मलबार हिल या मतदारसंघांतून प्रत्येकी १, तर धारावी, भायखळा व वडाळ््यातून प्रत्येकी २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर शीव कोळीवाड्यातून एकूण ३ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आज शिवडी, मुंबादेवी व कुलाबा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.
बोरीवलीमधून बहुजन विकास आघाडीच्या वतीने दत्ता कोरे यांनी तर मीरा कामत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दहिसरमधून आशिष फर्नांडिस, शेख अख्तार मुन्शी पेपरवाला, कपील सोनी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विक्रोळीतून भारिप बहुजन महासंघाकडून तृप्ती खरे आणि नॅशनल लोकतांत्रिक पार्टीकडून शेख अख्तर सरदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भांडूपमधून मनसेचे शिशिर शिंदे आणि इंद्रजित चड्डा, संतोष साठे यांनी अर्ज दाखल केला आहे. जोगेश्वरीतून अपक्ष म्हणून महेश सांवत यांनी अर्ज दाखल केला आहे. दिंडोशीतून संजय सपकाळ यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. चारकोपमधून भाजपाकडून योगेश सागर आणि बहूजन समाज पार्टीकडून सुनील गिरी यांनी अर्ज केला आहे. मालाड पश्चिममधून बहुजन समाज पार्टीकडून मीताली मिलिंद लवटे, अपक्ष म्हणून डिसोझा सिरील पीटर आणि इंडीयन बहुजन समाजवादी पार्टीकडून मॅक्सी डॉमनीक फारीया यांनी अर्ज दाखल केला आहे. गोरेगाव येथून शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी तर अविशा कुलकर्णी व समीर अंतुले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. कलिना येथून काँग्रेसकडून कृपाशंकर सिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अंधेरी पश्चिम येथून कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाकडून किडाप्पील केशव यांनी तर अंधेरी पूर्वे येथून नितीन खरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. चांदिवलीतून काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी तर अणुशक्ती नगर येथून भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे हुसेन खैरुनिसा अकबर हुसेन, राष्ट्रावादीचे मलीक नवाब इस्लाम यांनी अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)