गणेशोत्सवासाठी शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By admin | Published: September 5, 2016 12:09 AM2016-09-05T00:09:06+5:302016-09-05T01:31:15+5:30
नाशिक : गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे़ शहरात बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच अतिरिक्त २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, गणेशोत्सवात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत मंडळांना म्युझिक सिस्टीम लावण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे़

लाडक्या गणरायाचे सोमवारी (दि़५) आगमन होणार असून, या कालावधीत शहरात विविध मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे़ या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहरातील तेराही पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहे़ शहरातील वर्दळीची ठिकाणे, बसस्थानके, तसेच महत्त्वाच्या व मौल्यवान गणेश मंडळांभोवती पोलीस बंदोबस्त तसेच बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे़
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे यांच्यासह सर्व सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे़ या व्यतिरिक्त दोनशे पोलीस कर्मचारी, सीआरपीएफची एक तुकडी तैनात केली जाणार आहे़
चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी
गणेशोत्सव कालावधीत ९, ११, १४ व १५ सप्टेंबर हे चार दिवस गणेशोत्सव मंडळांना म्युझिक सिस्टिमसाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे़ या कालावधीत मंडळांनी आपले म्युझिक सिस्टीमचा आवाज हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मर्यादेपर्यंत ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)