फक्त दूध नव्हे तर शेण विकून झाला करोडपती; इंजिनिअर बनला उद्योगपती; आता कोट्यवधींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 12:02 IST2023-05-14T11:53:50+5:302023-05-14T12:02:03+5:30
तरुणाने नोकरी सोडून या कामात स्वत:ला वाहून घेतले. आज तो या व्यवसायातून भरपूर नफा कमावत आहे.

फक्त दूध नव्हे तर शेण विकून झाला करोडपती; इंजिनिअर बनला उद्योगपती; आता कोट्यवधींची कमाई
व्यवसाय करण्याची इच्छा आणि आवड असेल तर कोणताही व्यवसाय छोटा नसतो. एखादा छोटासा व्यवसाय करूनही मेहनतीने कोट्यवधींचं साम्राज्य उभारता येतं. व्यवसायातील यश पाहून अनेक सुशिक्षित तरुण त्यात नशीब आजमावत आहेत. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. ज्याने नोकरी सोडल्यानंतर आपल्या मनाचं ऐकलं आणि आज एक मोठा व्यापारी बनला. 26 वर्षीय जयगुरु आचार हिंडर हा एका खासगी कंपनीत सिव्हिल इंजिनियर होता. मात्र नंतर त्याने शेण आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला.
तरुणाने नोकरी सोडून या कामात स्वत:ला वाहून घेतले. आज तो या व्यवसायातून भरपूर नफा कमावत आहे. जयगुरु आचार हिंडर हा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील मुंडुरू गावचा रहिवासी आहे. त्यांनी विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, पुत्तूर येथून इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली. त्यानंतर 22000 रुपये पगारावर खासगी कंपनीत कामाला सुरुवात केली. पण हे काम त्याला आवडले नाही. रोजच्या कामाचा कंटाळा येऊ लागला. नोकरीत रस नसल्याने त्याने 2019 मध्ये नोकरी सोडली.
तरुणाला शेतीची आवड होती. त्याने वडिलांसोबत शेतीची कामे करण्यास सुरुवात केली. त्याच्या घरी 10 गायी होत्या, ज्यांच्यासोबत तो वेळ घालवत असे. त्याने उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग शोधले. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ पाहून हिंडरने पटियालाला जाण्याचा निर्णय घेतला. शेतीसोबतच दुग्धव्यवसाय सुरू केला आणि हळूहळू त्यांच्या डेअरीत 130 गायी वाढवल्या. त्यानंतर काही काळानंतर त्याने डेअरी वाढवण्यासाठी 10 एकर जमीनही विकत घेतली. यानंतर त्याच्या मनात एक कल्पना आली आणि त्याने एक मशीन विकत घेतली. हे यंत्र गायीचे शेण सुकवते.
हिंडर आता दर महिन्याला 100 पोती शेण विकतो आणि त्यातून भरपूर कमाई करतो. यामध्ये गायींचे शेण, गोमूत्र आणि गायींना आंघोळ घातल्यावर मिळणारे सांडपाणी यांचा समावेश आहे. हिंडर दररोज 750 लीटर दूध आणि दरमहा 30-40 लीटर तूप विकतो. 10 एकरात पसरलेल्या त्याच्या फार्महाऊसमध्ये तो हा व्यवसाय करतात. यातून तो दरमहा 10 लाख रुपये कमावतो. आणि आता तो दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी युनिट स्थापन करण्याच्या तयारीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.