Pulwama Attack: पुन्हा 'ती' चूक नाही होणार; पुलवामासारखा अनर्थ टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 06:11 PM2019-02-15T18:11:18+5:302019-02-15T18:15:01+5:30

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

civilian movement will be stopped for sometime when a large convoy of security forces passes says rajnath singh after pulwama attack | Pulwama Attack: पुन्हा 'ती' चूक नाही होणार; पुलवामासारखा अनर्थ टळणार

Pulwama Attack: पुन्हा 'ती' चूक नाही होणार; पुलवामासारखा अनर्थ टळणार

googlenewsNext

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानं देश हादरला आहे. सीआरपीएफच्या 38 जवानांना अवंतीपुरामध्ये वीरमरण आल्यानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा संताप आणखी वाढला. पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली.  मात्र त्याचवेळी, गुप्तचर यंत्रणेकडून 'हाय अ‍ॅलर्ट' जारी करण्यात आला असतानाही, सुरक्षा यंत्रणा इतकी गाफील का आणि कशी राहिली?, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. अडीच हजार जवानांचा ताफा येत असताना यंत्रणा सतर्क का नव्हती?, स्फोटकांनी भरलेली गाडी या रस्त्यावर आलीच कशी?, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. 

गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानुसार, सीआरपीएफचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देणं घातक ठरलं, अशी माहिती सीआरपीएफचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) कश्मीर जुल्फिकार हसन यांनी दिली. अडीच हजार जवानांचा ताफा जाण्यासाठी बराच वेळ लागणार होता. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ही परवानगी देण्यात आली होती. मात्र हीच चूक सीआरपीएफच्या जवानांच्या जीवावर बेतली. त्यामुळे आता ही चूक सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली. 




'काल सीआरपीएच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला. त्यामुळे यापुढे जेव्हा सुरक्षा दलांचा मोठा ताफा जाईल, त्यावेळी त्या रस्त्यावरील इतर वाहनांची वाहतूक रोखण्यात येईल. यामुळे स्थानिकांना थोडा त्रास होईल. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत,' असं राजनाथ सिंह म्हणाले. हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना अधिकाधिक मदत करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारांकडे करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. सीआरपीएफच्या जवानांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झालेला नाही. दहशतवादाविरोधातील कारवाई शेवटपर्यंत सुरुच राहील, असं राजनाथ यांनी स्पष्ट केलं. 




सीआरपीएफचा ताफा जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन जात असताना एका भागातून स्थानिकांच्या वाहनांना वाहतुकीसाठी देण्यात आलेली परवानगी जवानांच्या जीवावर बेतली. ताफा जाण्याआधी रोड ओपनिंग पार्टीनं गुरुवारी सकाळी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली होती. या मार्गावर कुठेही स्फोटकं सापडली नव्हती. तसंच, जवानांच्या ताफ्यावर गोळीबार होऊ नये, हँड ग्रेनेड फेकली जाऊ नयेत, यादृष्टीनंही पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु, काश्मिरी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून महामार्गाच्या एका भागातून त्यांच्या गाड्या नेण्यास संमती देण्यात आली होती. मात्र याचा गैरफायदा घेत जैश-ए-मोहम्मदचा आत्मघाती दहशतवादी आदिल अहमद सर्व्हिस रोडवरून राजमार्गावर आला आणि अघटित घडलं. 

Web Title: civilian movement will be stopped for sometime when a large convoy of security forces passes says rajnath singh after pulwama attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.