“तुम्हाला काही समजतं की नाही, १४० केसवर सुनावणी घेतो”; CJI चंद्रचूड पुन्हा वकिलावर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 04:56 PM2023-05-01T16:56:44+5:302023-05-01T16:58:52+5:30

CJI D. Y. Chandrachud: चंद्रचूड सरन्यायाधीश झाल्यानंतर सुप्रीम कोर्टातील याचिकांवरील सुनावणी पूर्वीपेक्षा वेगवान झाल्याचे सांगितले जात आहे.

cji d y chandrachud got angry while supreme court hearing when he saw writ asked the advocate do you know anything | “तुम्हाला काही समजतं की नाही, १४० केसवर सुनावणी घेतो”; CJI चंद्रचूड पुन्हा वकिलावर संतापले

“तुम्हाला काही समजतं की नाही, १४० केसवर सुनावणी घेतो”; CJI चंद्रचूड पुन्हा वकिलावर संतापले

googlenewsNext

CJI D. Y. Chandrachud: भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अनेकविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य करताना दिसत आहेत. केंद्रीय कायदा मंत्री यांनीही सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी दिलेल्या निर्देशांबाबत कौतुक केले आहे. अलीकडेच दोन याचिकांवरील सुनावणी दरम्यान सीजेआय चंद्रचूड यांनी वकिलांवर संताप व्यक्त केला होता. यातच पुन्हा एकदा CJI चंद्रचूड यांनी एका वकिलाला चांगलेच फटकारले आहे. 

CJI चंद्रचूड याचिकांवर सुनावणी घेत होते. तेव्हाच एका वकिलाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात खटल्यांची यादी योग्य पद्धतीने केली जात नाही. वकिलांनी केलेली रिट याचिका पाहून सरन्यायाधीश संतापले. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, ही कसली रिट आहे. आता १४० याचिकांवर सुनावणी घेतोय, असे सांगत वकिलाला खडे बोल सुनावले आणि रिट याचिका फेटाळून लावली. 

सर्वोच्च न्यायालयातील याचिकांच्या यादीवरून वकिलाची नाराजी

सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल केल्या जात आहेत, त्यांची यादी चुकीच्या पद्धतीने केली जाते. संवेदनशील प्रकरणांकडे लक्ष दिले जात नाही. कमी महत्त्वाच्या याचिकांवर प्रथम सुनावणी होत आहे, असा आक्षेप घेत न्यायालयातील प्रकरणांची यादी सॉफ्टवेअरद्वारे करावी, असा सल्लाही या वकिलाने दिला. या वकिलाने त्याची रिट याचिका थेट सरन्यायाधीशांच्या न्यायालयात दाखल केली. सदर वकील स्वतःही न्यायालयात उपस्थित होते. CJI चंद्रचूड यांच्यासमोर ही याचिका सुनावणीसाठी आल्यावर ती पाहून ते चांगलेच संतापले.

CJI चंद्रचूड यांनी वकिलाला प्रश्न करत चांगलेच सुनावले

सरन्यायाधीशांचा वकिलाला प्रश्न केला की, तुम्हाला काही माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयात सॉफ्टवेअरचाच वापर केला जातो. यातूनच याचिकांची यादी तयार केली जाते. तुम्ही बघा १४० केसेस चालू आहेत. सर्वोच्च न्यायालय कसे काम करते हे तुम्हाला माहिती आहे का, या शब्दांत CJI चंद्रचूड यांनी वकिलाला सुनावले. तरीही या वकिलाने संवेदनशील प्रकरणांना प्राधान्यक्रम देण्याची विनंती केली. यावर सरन्यायाधीशांनी याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार, मास्टर ऑफ रोस्टर हे स्वतः CJI असतात. रजिस्ट्रार जनरल त्यांच्या निर्देशानुसारच याचिकांची यादी करतात. चंद्रचूड CJI झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची सुनावणी पूर्वीपेक्षा वेगवान झाल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: cji d y chandrachud got angry while supreme court hearing when he saw writ asked the advocate do you know anything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.