CJI D. Y. Chandrachud: “आणीबाणीच्या काळात न्यायाधीशांनी हिंमत सोडली नाही”; CJI चंद्रचूड यांनी सांगितल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 02:42 PM2023-04-09T14:42:32+5:302023-04-09T14:43:56+5:30
CJI D. Y. Chandrachud: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यामुळे नवी दिशा मिळाली. त्यावर आम्ही बरेच काम केले, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.
CJI D. Y. Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अनेक विषयांवर स्पष्टपणे भाष्य करत असतात. यातच आता चंद्रचूड यांनी आणीबाणी काळातील आठवणी सांगताना त्या काळात न्यायाधीशांनी हिंमत सोडली नाही, असे प्रतिपादन केले. तसेच न्यायाधीशांनी सामाजिक असावे. त्यांचा समाजाशी संबंध असणे आवश्यक आहे. जेव्हा हे घडते, तेव्हा त्यांनी दिलेले निर्णय अधिक अर्थपूर्ण असतात, असेही चंद्रचूड यांनी नमूद केले.
जेव्हा कायद्याच्या तत्त्वांचे पालन केले जात नाही. तेव्हा ते निर्णयांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. आपण सर्व न्यायाधीश आणि वकील या देशातील सामान्य नागरिकांसारखे आहोत. संविधान आपल्या सर्वांना योग्य मार्ग दाखवते, असेही चंद्रचूड यांनी सांगितले. स्वातंत्र्य, समानता यासारख्या मुद्द्यांवर संविधानात केलेल्या तरतुदी आपल्या देशाला एका धाग्यात बांधतात. आणीबाणीच्या काळात गुवाहाटी उच्च न्यायालयाने ज्या प्रकारचे काम केले ते कौतुकास्पद आहे. तो काळ इतका कठीण होता की, न्यायाधीशांनाही कठीण गोष्टींना सामोरे जावे लागले. पण कायदा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही, असे कौतुकोद्गार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काढले.
या दिशेने बरेच काम केले गेले
समाजातील दुर्बल घटकाला न्याय मिळवून देणे हे आमचे प्राधान्य असायला हवे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले होते. यावर बोलताना, सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आम्हाला नवीन दिशा मिळाली आणि त्यादिशेने आम्ही बरेच काम केले. तसेच आसाम नेहमीच कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतो. येथे दरवर्षी पुराचा प्रश्न येतो. लोकांची कागदपत्रेही गहाळ होतात. त्यांना मदतीची गरज आहे. गुवाहाटी उच्च न्यायालय दरवर्षी असे अनेक निर्णय देते जे आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी असतात. त्यांना मदत करणे हे सर्वात मोठे काम आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य असले पाहिजे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले.
दरम्यान, कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळ्यांमध्ये अडकून लोकांना त्रास होणार नाही, हे न्यायव्यवस्थेने पाहावे, असा सल्ला देताना, कायद्याचा वापर अशा प्रकारे व्हायला हवा की, ज्यामुळे समस्या मुळापासून नष्ट होईल. पीडित पक्षाला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करा, अशी सूचनाही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचडू यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"