DY Chandrachud Lifestyle: भारताचे सरन्यायाधीश पहाटे किती वाजता उठतात? पाहा कशी आहे त्यांची लाइफस्टाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 08:55 PM2023-01-10T20:55:00+5:302023-01-10T20:55:42+5:30
त्यांचा आहार कसा असतो? कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं? जाणून घ्या सारं काही...
CJI DY Chandrachud Lifestyle: भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात न्यायव्यवस्थेला खूप महत्त्व आहे. सर्वोच्च न्यायालय हे न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च केंद्र आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) हे न्यायदानाचे काम पाहत आहेत. ते भारताचे सरन्यायाधीश आहेत, त्यांची कामे आणि कामाची पद्धतही वेगळी आहे, त्यामुळेच त्यांची जीवनशैलीही इतरांपेक्षा वेगळी असणे स्वाभाविक आहे.
"सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मला एका आठवड्यात सुमारे २५० खटल्यांचे वाचन करावे लागते. त्यात हत्येच्या खटल्यापासून ते मालमत्ता आणि व्यावसायिक अशा विविध प्रकारची प्रकरणे आहेत. मला ती सर्व कामे व्यवस्थापित करावी लागतात. त्यामुळे मी सकाळी ३.३० वाजता उठतो. हा माझ्यासाठी सर्वोत्तम वेळेचा भाग आहे. यावेळी माझे बहुतेक काम पूर्ण होते. ९.३०-१० पर्यंत माझे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो," असे खुद्द चंद्रचूड यांनी सांगितले.
'मी-टाईम'मध्ये काय करतात?
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना वाचनाची आवड आहे. ते रात्री ८ वाजल्यापासून १ ते २ तास अभ्यास करतात. या वेळेला ते त्यांचा 'मी-टाईम' म्हणजे स्वत:साठी राखून ठेवलेला वेळ म्हणतात. तर दुसरीकडे, जर आपण आहाराविषयी बोलायचे झाले तर त्यांना मोजके पदार्थ खायला आवडते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पाश्चात्य संगीत ऐकायला आवडते. 'कोल्डप्ले' आणि ख्रिस मार्टिन सारख्या गायकांची गाणी त्यांना आवडतात. २०१९ मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी आपली जीवनशैली कशी आहे हे सांगितले होते. त्यावेळी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
सरन्यायाधीशपदी कधीपर्यंत असणार?
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते आणि फिरायलाही आवडते. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी CJI म्हणून पदभार स्वीकारला आणि ते १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून कायम राहणार आहेत. CJI चंद्रचूड यांचे वडील YV चंद्रचूड हे भारताचे १६वे सरन्यायाधीश होते. २ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत ते CJI होते.
वैयक्तिक आयुष्याबद्दल...
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या पत्नीचे नाव कल्पना दास आहे. त्या वकील आहेत. त्यांनी दोन मुलींना दत्तक घेतले आहे. एकीचे नाव माही आणि दुसरीचे नाव प्रियांका आहे. कल्पना दास या न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचा २००७ साली कर्करोगाने मृत्यू झाला होता.