सरन्यायाधीशांसोबत वाद घालणारे वकील मॅथ्यूज नेदुमपारा कोण आहेत? वाचा सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:40 PM2024-07-24T12:40:55+5:302024-07-24T12:41:52+5:30
न्यायालयात हजर असलेले वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे सातत्याने मध्ये बोलत होते. या कृतीमुळे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड संतापले.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी परीक्षेच्या (UG NEET Exam) निकालावरील सुनावणीदरम्यान सरन्यायधीश डीवाय चंद्रचूड आणि याचिकाकर्त्यांचे वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात सुनावणी सुरू होती. त्यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुडा हे युक्तिवाद करत होते. यादरम्यान, न्यायालयात हजर असलेले वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे सातत्याने मध्ये बोलत होते. या कृतीमुळे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड संतापले.
नेमकं काय घडलं?
याचिकाकर्त्याचे वकील नरेंद्र हुड्डा खंडपीठाला संबोधित करत असताना वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे मुद्दा सांगण्यासाठी उठले. यावेळी वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना शांत बसण्याच्या सूचना केल्या. पण आपण अॅमिकस म्हणजे कोर्टाचा मित्र म्हणून असल्याने बोलत आहोत असं वकील मॅथ्यूज नेदुमपारा म्हणाले. त्यावर आपण या प्रकरणात कुणालाही अॅमिकस म्हणून नियुक्त केलं नाही असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. त्यावर वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी सरन्यायाधीशांना उलट उत्तर दिलं. तुम्ही जर माझा आदर करत नसाल तर मी निघून जातो असं ते म्हणाले.
वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांच्या या कृतीवर सरन्यायाधीश भडकले. ते म्हणाले की, तुम्ही माझं ऐका आणि शांत बसा. अन्यथा तुम्हाला सुरक्षा रक्षकांना बोलावून बाहेर काढण्यात येईल, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी ताकीद दिली. तरीसुद्धा ते थांबले नाहीत. सरन्यायाधीशांनी सुरक्षा रक्षकांना बोलावल्यानंतर वकील मॅथ्यूज नेदुमपारा म्हणाले की, मी स्वतः जातो. त्यावर सरन्यायाधीश पुन्हा म्हणाले की, मी गेल्या २४ वर्षांपासून न्यायप्रक्रियेत आहे. अशा प्रकारे कोर्टाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यास मी खपवून घेणार नाही. त्यावर वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनीही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, मीही या ठिकाणी १९७९ पासून काम करतोय. तुम्ही अशा प्रकारे कुणाला बाहेर काढू शकत नाही, असं म्हणत वकील मॅथ्यूज नेदुमपारा न्यायालयाबाहेर गेले. यानंतर थोड्या वेळानं वकील मॅथ्यूज नेदुमपारा पुन्हा न्यायालयात आले आणि त्यांनी माफी मागितली.
सरन्यायाधीशांसोबत आधीही घातला होता वाद!
सर्वोच्च न्यायालयात वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांचा सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्याशी वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी अशा प्रकारचा वाद घातला आहे. इलेक्टोरल बाँड्स प्रकरणाच्या सुनावणीवेळीही त्यांनी अशाच प्रकारे न्यायालयामध्ये युक्तिवादामध्ये व्यत्यय आणला होता. त्यावेळीही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना चांगलंच सुनावलं होतं.
कोण आहेत मॅथ्यूज नेदुमपारा?
मॅथ्यूज नेदुमपारा हे ज्येष्ठ वकील आहेत. दिवाणी, फौजदारी, संवैधानिक, बँकिंग आणि वित्त यासह कायद्याच्या क्षेत्रात त्यांना मोठा अनुभव आहे. सार्वजनिक समस्यांशी, विशेषत: न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी ते त्यांच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. २०१० मध्ये, त्यांनी न्यायिक पारदर्शकता आणि सुधारणांसाठी राष्ट्रीय वकील अभियानाची स्थापना केली होती.
यापूर्वीही अडकले होते वादात!
वरिष्ठ वकिलाचे नाव घेऊन न्यायाधीशांच्या मुला-मुलींना 'वरिष्ठ वकील' पद देण्यास प्राधान्य दिले जाते, असा आरोप केल्याबद्दल वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना अवमान केल्याप्रकरणी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले होते. न्यायमूर्ती आर. न्यायमूर्ती नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या खंडपीठाने त्यांना अवमानासाठी दोषी ठरवले आणि ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी बिनशर्त माफी मागितल्यानंतर त्यांची शिक्षा स्थगित करण्यात आली. पण न्यायालयाने वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना सर्वोच्च न्यायालयात कायद्याचा सराव करण्यास एक वर्षासाठी मनाई केली होती. तसंच, वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे न्यायव्यवस्थेतील नियुक्त्यांच्या कॉलेजियम पद्धतीवर टीका करण्यासाठी देखील ओळखले जातात.