सुप्रीम कोर्टात Yeah म्हणणाऱ्या वकिलावर संतापले सरन्यायाधिश; म्हणाले, "हे काय कॉफी शॉप नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 02:35 PM2024-09-30T14:35:26+5:302024-09-30T14:40:00+5:30
भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एका वकिलाला कोर्टात 'Yeah' असे अनौपचारिक शब्द वापरल्याबद्दल फटकारले.
CJI DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी एका वकिलाला न्यायालयीन शिष्टाचाराचे धडे दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या सुनावणीत भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एका वकिलाला कोर्टात 'Yeah' असे अनौपचारिक शब्द वापरल्याबद्दल फटकारले. कोर्टात मर्यादा आणि औपचारिकता जपण्यावर भर देताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मला या शब्दांची खूप ॲलर्जी असल्याचे म्हटलं. तसेच हे सहन केले जाऊ शकत नाही, असाही इशारा सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी दिला.
भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या अनौपचारिक भाषेवर अपवाद घेतला. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करण्यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी सुरु होती. सरन्यायाधीशांसमोर वकील आपल्या याचिकेबद्दल सांगत असताना याह (yeah) शब्दाचा वापर केला. यावरुन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला सुनावलं आणि 'Yeah, Yeah, म्हणू नका, त्याऐवजी 'Yes, yes, yes' म्हणा असं सांगितले.
याचिकेवर सुनावणी सुरु असताना याचिकाकर्ते वकील सतत मान डोलावून Yeah, Yeah, Yeah असं म्हणत होते. त्यावर सरन्यायाधीशांनी वकिलाला Yeah, Yeah, Yeah म्हणण्यापेक्षा Yes, Yes, Yes (येस) म्हणा असं सांगितले. त्यानंतर वकिलाने माफी मागितली आणि आपला मुद्दा मांडण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतरही वकिलाने पुन्हा एकदा Yeah चा उच्चार केला. त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना पुन्हा एकदा Yeah ऐवजी Yes म्हणण्यास सांगितले. त्यानंतर हे काही कॉफी शॉप नाही, मला या 'या, या, या शब्दाची खूप ऍलर्जी आहे. न्यायालयात असे शब्द वापरण्याची परवानगी देता येत नाही, अशा शब्दात सरन्यायाधिशांनी खडसावलं.
याचिकाकर्त्या वकिलाने २०१८ मध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्या वकिलाने गोगोई यांच्याविरोधात चौकशीची मागणी करत होते, जे आता राज्यसभा खासदार आहेत. वकिलाने आपल्या कायदेशीर भूमिकेचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि माजी रंजन गोगोई यांच्या निकालांचा हवाला दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना न्यायाधीशांवर अशा प्रकारे आरोप करण्यास मनाई केली आणि त्यांना याचिकेतून न्यायमूर्ती गोगोई यांचे नाव काढून टाकण्याचे निर्देश दिले.
"न्यायमूर्ती गोगोई आता निवृत्त न्यायाधीश आहेत आणि न्यायालय अशा प्रकारच्या चौकशीचे आदेश देऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका आधीच फेटाळण्यात आली आहे, त्यामुळे याचिकाकर्त्याने आता क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळली पाहिजे. ही कलम ३२ याचिका आहे का? तुम्ही प्रतिवादी म्हणून न्यायाधीशांसमोर जनहित याचिका कशी दाखल करू शकता?," असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला सांगितले.