CJI DY Chandrachud: ज्या बंगल्यात वडिलांसोबत बालपण घालविले, तिथे CJI चंद्रचूड राहणार नाहीत, पहिल्यांदाच सरन्यायाधीशांचा पत्ता बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 08:39 AM2023-01-08T08:39:43+5:302023-01-08T08:40:39+5:30
सरन्यायाधीश झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी लोकांची गर्दी असते, विविध राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपासून ते न्यायाधीशांपर्यंत अनेक लोक येत असतात. सध्या ते न्यायमूर्तींच्या बंगल्यात राहत आहेत. तो बंगला छोटा पडतोय...
इतिहासात पहिल्यांदा भारताच्या सरन्यायाधीशांचा पत्ता बदलणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे लुटियंस दिल्लीच्या 19 अकबर रोड बंगल्यात शिफ्ट होणार आहेत. चंद्रचूड हे सरन्यायाधीशांसाठी आरक्षित असलेल्या 5 कृष्ण मेनन मार्ग बंगल्यात राहणार नाहीत. कारण माजी सरन्यायाधीश यू यू लळीत हे सध्या तिथे राहत आहेत.
लळीत यांना फेब्रुवारी अखेरीस बंगला सोडायचा आहे. यानंतर या बंगल्याची दुरुस्तीची कामे करायची आहेत. यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे. यामुळे चंद्रचूड या बंगल्यात राहू शकत नाहीत.
न्यायमूर्ती चंद्रचूड सध्या 14 तुघलक रोड, लुटियन्स दिल्ली येथे एका बंगल्यात राहत आहेत. 2016 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता. तेव्हापासून ते या बंगल्यात राहत होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा १४ तुघलक रोड येथील बंगला खूपच छोटा आहे.
सरन्यायाधीश झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी लोकांची गर्दी असते, विविध राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपासून ते न्यायाधीशांपर्यंत अनेक लोक येत असतात. अशा परिस्थितीत व्यवस्थापन करणे कठीण होते. तुघलक रोडच्या बंगल्यात न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे सहाय्यक आणि कर्मचाऱ्यांसाठी योग्य जागा देखील नाहीय. यामुळे त्यांना बंगला बदलणे भाग आहे.
९ अकबर रोड येथील बंगला दोन मजली आहे. एका भागात कार्यालयाची जागा आहे. लळीत हे सरन्यायाधीश होण्यापूर्वी या बंगल्यात राहत होते आणि त्यादरम्यान या बंगल्यात अनेक नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती वायव्ही चंद्रचूड हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असताना 5 कृष्ण मेनन मार्ग बंगल्यावरच राहत होते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचे 1978 ते 1985 पर्यंतचे बालपण याच बंगल्यात गेले. परंतू आता सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांना या बंगल्यात जाता येणार नाहीय.