CJI DY Chandrachud's Daughters : सरन्यायाधीश होणे सोपे काम असते का? चंद्रचूड़ यांनी तक्रार करणाऱ्या लेकींना थेट न्यायालयात आणले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 12:29 PM2023-01-07T12:29:35+5:302023-01-07T12:29:58+5:30
न्यायमूर्ती चंद्रचूड सकाळी 10 च्या सुमारास न्यायालयाच्या आवारात पोहोचले. मुलींना त्यांनी नियम पाळत व्हिजिटर्स गॅलरीतून त्यांच्या कोर्टरूममध्ये (कोर्ट क्रमांक एक) घेऊन गेले.
काय पप्पा.... जेव्हापासून तुम्ही सरन्यायाधीश झालाय तेव्हापासून आम्हाला वेळच देत नाहीय... अशी देशाचे नवे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या मुली तक्रार करत होत्या. चंद्रचूड यांना दोन मुली आहेत, प्रसंगी वडिलांचा निर्णय फिरविणाऱ्या चंद्रचूड यांना या मुलींच्या तक्रारींचे निरसन करता येत नव्हते. अखेर त्यांनी आपल्या मुलींना थेट न्यायालयातच सोबत नेले.
आता काम वाढलेय, असे ते सरन्यायाधीश झाल्यापासून मुलींना सांगत असायचे. परंतू त्यांची वेळ देत नसल्याची तक्रार काही कमी होत नव्हती. शेवटी वैतागून चंद्रचूड यांनी ठरविले की आता यांना न्यायालयात नेऊनच दाखवावे. पद वाढले तशी जबाबदारीही वाढलीय. चंद्रचूड यांनी माही आणि प्रियंकाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आणले.
न्यायमूर्ती चंद्रचूड सकाळी 10 च्या सुमारास न्यायालयाच्या आवारात पोहोचले. मुलींना त्यांनी नियम पाळत व्हिजिटर्स गॅलरीतून त्यांच्या कोर्टरूममध्ये (कोर्ट क्रमांक एक) घेऊन गेले. 'बघा, मी इथे बसतो.', असे ते मुलींना म्हणाले. यानंतर चेंबरमध्ये नेले आणि त्यांना न्यायाधीश बसतात आणि वकील त्यांची बाजू मांडतात ती जागा दाखवली.
विविध प्रशासकीय बाबींवर सरन्यायाधीशांकडून सूचना घेण्यासाठी निबंधकांची फौज तिथे सरन्यायाधीशांची वाट पाहत उभी होती. ते पाहून माही आणि प्रियंकाला आश्चर्याचा धक्का बसला. सकाळी 10.30 वाजता कामकाज सुरू करण्यापूर्वी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलांच्या प्रवेशद्वारातून मुलींना नेत व्हील चेअरवर बसवले तेव्हा सर्वजण थक्क झाले. त्या दोन्ही मुली दिव्यांग आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड साध्या वेशात होते. मुलींना आता कळून चुकले की कळले की 9 नोव्हेंबरपासून वडिलांवरील कामाचा ताण खरोखरच वाढला आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड आणि त्यांची पत्नी कल्पना यांनी माही आणि प्रियंकाला दत्तक घेतलेले आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते दोन वर्षांसाठी या पदावर राहतील आणि 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होतील. त्यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड हे 16 वे सरन्यायाधीश होते. भारताच्या सरन्यायाधीशपदावर ७ वर्षे पाच महिने राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.