हेमा मालिनींना चाहत्यांपासून वाचवण्यासाठी शरद बोबडे यांनी लढवली होती 'ही' शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 09:37 AM2019-11-18T09:37:37+5:302019-11-18T09:50:48+5:30
न्या. शरद बोबडे यांनी लोकप्रिय अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासाठी युक्तिवाद केला होता.
नवी दिल्ली - मराठमोळे न्या. शरद अरविंद बोबडे आज सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून बोबडे सूत्रे स्वीकारतील. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळणार आहे. सोमवारी (18 नोव्हेंबर) सकाळी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद न्या. बोबडे यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. न्या. शरद बोबडे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नात्याने गेल्या सहा वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत.
न्या. शरद बोबडे यांनी लोकप्रिय अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासाठी युक्तिवाद केला होता. हेमा मालिनीविरुद्ध व्यावसायिक एन. कुमार यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात धनादेश अनादराची तक्रार दाखल केली होती. त्यासाठी हेमा मालिनी यांना न्यायालयात हजर व्हायचे होते. न्या. बोबडे त्यांचे वकील होते. चाहत्यांपासून बचाव करण्यासाठी न्या. बोबडे यांनी हेमा मालिनी यांना बुरखा घालून न्यायालयात हजर केले होते. ती शक्कल यशस्वी ठरली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानता याचिका दाखल करण्यात आली होती. त्या वेळी न्या. बोबडे वकील होते. दरम्यान, वडिलांसोबत मिळून त्यांनी उच्च न्यायालयात बाळासाहेबांची बाजू समर्थपणे मांडली होती, तसेच छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडल्यानंतर ते पक्षांतर बेकायदा ठरविण्यासाठी बोबडे यांनी शिवसेनेच्या वतीने खिंड लढवली होती. तसेच न्या. शरद बोबडे व शेतकरी नेते शरद जोशी हे जवळचे मित्र होते. बँकेचे कर्ज फेडू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना नादारीचे अर्ज भरायला लावण्याची कल्पना या दोघांच्या चर्चेतून पुढे आली होती. त्यानंतर सुमारे चार लाख शेतकºयांनी असे अर्ज भरले होते. बोबडे यांनी संबंधित न्यायालयात त्या शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यासाठी ते राज्यभर फिरले होते. लाखो शेतकऱ्यांच्या वतीने लढणारे बोबडे हे देशातील एकमेव वकील होते. याच नादारीच्या आंदोलनातून पुढे कर्जमुक्तीची चळवळ सुरू झाली होती.
2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदाची कारकिर्द सुमारे दीड वर्षाची असेल. वयाची 65 वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजे 23 एप्रिल 2021 रोजी ते निवृत्त होतील. आधीचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई सुमारे 13 महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता करून रविवारी सायंकाळी निवृत्त झाले. आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी त्यांनी केली होती. त्यानुसार 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची 18 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती. बोबडे यांच्या निमित्ताने तब्बल साडेतीन दशकांनंतर मराठी माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील विधी क्षेत्र राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.