CJI Uday Lalit: महाराष्ट्राचा सुपूत्र आज निवृत्त होतोय! लळीत सहा महत्वाच्या खटल्यांवर निकाल देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 08:29 AM2022-11-07T08:29:46+5:302022-11-07T08:30:24+5:30
CJI Uday Lalit Retirement: दुपारी दोन वाजता सेरेमोनियल बेंचचे कामकाज सुरु होणार आहे. यामध्ये भावी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेद सहभागी होणार आहेत.
देशाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपूत्र उदय लळीत हे आठ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. परंतू, या दिवशी गुरु नानक जयंती असल्याने न्यायालयांना सुट्टी असणार आहे. यामुळे लळीत यांच्या कामकाजाचा आजचाच अखेरचा दिवस आहे. या दिवशी लळीत सहा महत्वाच्या खटल्यांवर सुनावणी घेणार आहेत. तसेच निकालही देण्याची शक्यता आहे. या कामकाजाचे लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे.
दुपारी दोन वाजता सेरेमोनियल बेंचचे कामकाज सुरु होणार आहे. यामध्ये भावी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेद सहभागी होणार आहेत. सेरेमोनिअल बेंचमध्ये मावळते सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याकडे अधिकार सोपवितात. यावेळी बारचे अन्य सदस्य आणि अधिकारी त्यांना निरोप देतात.
लळीत यांच्या आजच्या कामकाजात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, सामान्य वर्गातील आर्थिक गरीब घटकाला १० टक्के आरक्षणाचा मुद्दा आहे. या आरक्षणाच्या संविधानीक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दुसरे प्रकरण आम्रपाली निवास योजनेशी संबंधीत आहे. यामध्ये लाभार्थ्यांना फ्लॅट देणे किंवा त्याबदल्यात पैसे देण्यावर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. चार अन्य प्रकरणे साधी आहेत.
लळीत यांनी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हमून २७ ऑगस्टला शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ ७४ दिवसांचा होता. या काळात त्यांनी प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी एक सुपरफास्ट प्रणाली अंमलात आणली. यावरून त्यांच्याविरोधात न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली असली तरी अनेक खटले निकाली लागले आहेत. उदय लळीत यांचे आजोबा रंगनाथ लळीत हे कोकणातून सोलापूरला गेले होते. तिथे त्यांनी वकीली केली. उदय़ लळीत यांचे वडीलही वकील होते, ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले होते. लळीत यांची चौथी पिढी देखील न्यायपालिकेत आहे. मुलगा श्रेयश आणि त्याची पत्नी रवीना हे दोघेही वकील आहेत.