वाड्रा यांनी बेकायदा ५० कोटी कमावल्याचा दावा
By admin | Published: April 29, 2017 12:34 AM2017-04-29T00:34:14+5:302017-04-29T00:34:14+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी २००८ मध्ये हरियाणातील जमीन व्यवहारात ५०.५ कोटी रुपयांचा अवैध नफा कमावला होता.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी २००८ मध्ये हरियाणातील जमीन व्यवहारात ५०.५ कोटी रुपयांचा अवैध नफा कमावला होता. एका इंग्रजी वृत्तपत्रात हा दावा करण्यात आला आहे. या व्यवहारासाठी दमडीही खर्च न करता वाड्रा यांनी नफा कमावल्याचे जस्टिस एस. एन. ढिंगरा आयोगाने मान्य केले.
वाड्रा यांच्या कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी हातमिळवणी करण्यात आली होती. आयोगाने वाड्रा आणि त्यांच्या कंपन्यांच्या जमीन खरेदीची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. ढिंगरा आयोगाच्या अहवालाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. वाड्रा यांचे वकील सुमन खेतान यांनी वृत्तपत्राला सांगितले की, आपले पक्षकार आणि त्यांच्या कंपन्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही, तसेच कायद्याचे उल्लंघनही झालेले नाही. बाजारमूल्य दिल्यानंतर जमीन खरेदी करण्यात आली, तसेच आयकरही भरण्यात आला. हरियाणातील भाजप सरकारने वाड्रा यांच्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्यासाठी २०१५ मध्ये ढिंगरा आयोगाची स्थापना केली होती. वाड्रा आणि त्यांची कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने गुरगाव येथे बेकायदेशीररीत्या जमिनीचे खरेदी व्यवहार केल्याचा आरोप आहे. वाड्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. राजकीय सुडापोटी आपले नाव गोवले जात असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.