Coronavirus: दिल्लीत संमेलनाची पूर्वसूचना प्रशासनाला दिल्याचा दावा; आयोजकांनी मांडली आपली बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:51 AM2020-04-02T00:51:25+5:302020-04-02T06:33:49+5:30
प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही; २५ मार्चला मेडिकल टीमसह केले होते निरीक्षण
नवी दिल्ली : येथील मरकज निजामुद्दीन इथे आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी समाजाचा कार्यक्रम कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूीवर वादात सापडला आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी मात्र हे संमेलन पूर्वनियोजित होते व यासाठी प्रशासनाला पूर्वसूचना दिल्याचा दावा केला आहे. याबाबत आयोजकांनी आपली बाजू मंगळवारी जगासमोर मांडली.
आयोजकांचे म्हणणे होते की, पंतप्रधान मोदी यांनी २२ मार्चला एकदिवसाचा जनता कर्फ्यू घोषित केला, तेव्हा मरकजमध्ये कार्यक्रम सुरू होते. कर्फ्यूमुळे ते त्वरित थांबवण्यात आले. खरे तर २१ मार्चला भाविक आपापल्या गावी जाणार होते, मात्र रेल्वे बंद असल्याने ते मरकजमध्ये अडकून पडले.
कर्फ्यू उठविल्यानंतर रेल्वेने भाविकांनी आपल्या गावी जाण्याची पुन्हा तयारी केली, मात्र हा कर्फ्यू उठण्यापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगेच दिल्ली पूर्णपणे लॉकडाऊन केल्याची घोषणा केल्याने त्यांचा नाईलाज झाला. तेव्हा मरकजने प्रशासनाच्या मदतीने वाहनांची व्यवस्था केली आणि १५०० लोकांनी मर्कज सोडले. मरकज बंद करण्यात येत असल्याचे पत्र हजरत निजामुद्दीन पोलीस ठाण्याला २४ मार्चलाच दिले होते. तिथे उपस्थित असलेले व सोडून गेलेले १५०० जणांची ओळखपत्रासह यादी जिल्हाधिकारी यांना दिल्याचा दावा आयोजकांनी केला.
२५ मार्चला तहसिलदारांनी मेडिकल टीमसह मरकजचे निरीक्षण केले. काही जणांची तपासणीही केली. २६ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा केला. पुढच्या बैठकीला मरकज पदाधिकाऱ्यांना बोलाविले. तिथे अडकल्यांची यादी देऊन त्यांच्या प्रवासासाठी आवश्यक परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. २७ मार्चला ६ जणांना मेडिकल चेकअपसाठी ताब्यात घेण्यात आले.
२८ मार्चला ३३ जणांना राजीव गांधी मेडिकल कॉलेजमधे कॅन्सर तपासणीसाठी नेले. पण त्याच दिवशी पोलिसांनी आदेश मोडल्याबद्दल मरकजला नोटिस बजावली. ३० मार्चला विविध टीव्ही चॅनल्स आणि मीडियात ही चर्चा करण्यात येऊ लागली की मरकजमधे कोरोनाचे रुग्ण आहेत आणि हेदेखील प्रचारित केल्या जाऊ लागले की काही लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घोषणा केली की, त्यांनी मरकजच्याविरुद्ध प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश दिले आहे. हे करण्याआधी त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदारांना विचारले नाही. त्यांनी आधीच मर्कजचा दौरा करून अहवाल बनविला होता. मर्कजने कुणालाही कायद्याचे उल्लंघन करू दिले नव्हते की बाहेर निघू दिले नव्हते! वैद्यकीय तपासण्या तहसीलदार यांच्यासह आलेल्या वैद्यकीय टीमने केलेल्या होत्या. करुणा आणि मानवतेच्या दृष्टीने मर्कजमधे अडकलेल्या समस्तांची देखरेख करीत होती. सोशल डिस्टनसिंग आणि मास्क सर्वांना देण्यात आले होते.