कोलकाता महापालिकेत फुलऑन राडा! भाजपा आणि तृणमूलच्या नगरसेवकांत हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 07:22 PM2023-09-16T19:22:42+5:302023-09-16T19:23:01+5:30
माला रॉय तसेच केएमसीचे महापौर फिरहाद हकीम यांच्या टिप्पण्यांवरून गोंधळ सुरू झाला होता.
पश्चिम बंगालमध्येभाजपा आणि तृणमूलच्या कार्यकर्ते, नेत्यांमधून विस्तवही जात नाही एवढे वैर आहे. कोलकाता महापालिकेमध्ये शनिवारी दोन पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी एकमेकांना मारहाण केली, तसेच धक्काबुक्की केली.
तृणमुलचे असीम बसू आणि भाजपाचे सजल घोष यांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली. परिस्थिती एवढी बिघडली की महापौरांना काही काळासाठी कामकाज थांबवावे लागले. त्यांनी हाणामारी अन्य सदस्यांनी सोडविली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
माला रॉय तसेच केएमसीचे महापौर फिरहाद हकीम यांच्या टिप्पण्यांवरून गोंधळ सुरू झाला होता. भाजप आणि डाव्या आघाडीने अधिवेशनासाठी कोणताही प्रश्न किंवा प्रस्ताव उपस्थित केला नाही, असे ते म्हणाले होते. माला रॉय यांनी या अधिवेशनासाठी विरोधकांकडे प्रश्नच नसणे हे आश्चर्यकारक असल्याची टिप्पणी केली. यावरून वाद सुरु झाला.
सजल घोष यांनी यावर आक्षेप घेतला. अधिवेशनादरम्यान कोणतेही प्रश्न किंवा प्रस्ताव मांडायचा कशासाठी? सत्ताधारी पक्षाचे सदस्य विरोधकांना काही महत्त्व देतात का? असा सवाल केला. यावर माला रॉय यांच्याशी बाचाबाची झाली. यानंतर असीम बसू यांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला.