तिहार तुरुंगात पुन्हा दोन गटात हाणामारी, 15 कैदी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 01:00 PM2022-04-22T13:00:26+5:302022-04-22T14:33:34+5:30
Tihar Jail : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील कैद्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी झाली आहे. तिहार तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या या हिंसक हामामारीत जवळपास 15 कैदी जखमी झाले. यातील काही कैद्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील कैद्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
तिहार प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तिहार तुरुंगात कैद्यांच्या हाणामारीची ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती, ज्यामध्ये तुरुंग क्रमांक 8 आणि 9 मध्ये कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती आणि या घटनेत 15 कैदी जखमी झाले होते. दरम्यान, काही कैद्यांना प्राथमिक उपचारानंतर पुन्हा तुरुंगात हलवण्यात आले, तर काही जखमी कैद्यांवर तुरुंगातच उपचार सुरू आहेत, असे तिहार प्रशासनाने सांगितले. तसेच, तुरुंग प्रशासनाने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Delhi | 15 inmates in Tihar Jail found with self-inflicted injuries. Most of them have got mild injuries. Investigation regarding it is underway: Jail officials
— ANI (@ANI) April 22, 2022
दरम्यान, तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये हाणामारी होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी फेब्रुवारीमध्येही तिहार तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती आणि या घटनेत सहायक तुरुंग अधीक्षक आणि वॉर्डरही जखमी झाले होते. या हाणामारीत चार कैदी गंभीर जखमी झाले होते. ही घटना तुरुंग क्रमांक 4 मध्ये घडली होती. कैद्यांमध्ये सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना सहायक तुरुंग अधीक्षक जखमी झाले होते.