गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशात तणाव, हिंसाचारात पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:26 PM2018-12-03T16:26:50+5:302018-12-03T16:30:29+5:30
कथित गोरक्षकांनी उत्तर प्रदेशामध्ये पुन्हा डोके वर काढले असून, राज्यातील बुलंदशहर जिह्ल्यामध्ये गोहत्येच्या संशवावरून हिंसाचार उसळला.
बुलंदशहर - कथित गोरक्षकांनी उत्तर प्रदेशामध्ये पुन्हा डोके वर काढले असून, राज्यातील बुलंदशहर जिह्ल्यामध्ये गोहत्येच्या संशवावरून हिंसाचार उसळला. यावेळी हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि वाहनांची जाळपोळ केली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यादरम्यान, हिंसक जमावाला रोखताना स्याना पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंश आढळला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
One police inspector dead during a clash with people protesting against illegal slaughterhouses in Bulandshahr pic.twitter.com/Ugts7FDtsI
— ANI UP (@ANINewsUP) December 3, 2018
या प्रकारानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बुलंदशहर येथील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मीरतचे एडीजी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे.