शेतकरी व स्थानिकांमध्ये सिंघू सीमेजवळ चकमक; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 04:25 AM2021-01-30T04:25:39+5:302021-01-30T04:25:53+5:30
शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार बळाचा वापर करत आहे असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिरसिंग बादल यांनी केला आहे.
नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीजवळील सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये शुक्रवारी जोरदार चकमक झाली. बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीमार केला.
सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलकांनी ही जागा सोडून निघून जावे, अशी मागणी करत शेकडो स्थानिक नागरिक तिथे जमा झाले. पण, तिथून जाण्यास शेतक-यांनी नकार देताच स्थानिक नागरिक संतप्त झाले. शेतकरी व त्यांच्यामध्ये जोरदार चकमक सुरू झाली. काही ठिकाणी दगडफेकही झाली. शेतकरी राहात असलेले तंबू पाडून टाकण्याचा प्रयत्न झाला. सरतेशेवटी या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. या घटनेनंतर सिंघू सीमेवरील बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार बळाचा वापर करत आहे असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिरसिंग बादल यांनी केला आहे.
सिंघू सीमेवर जिथे आंदोलन सुरू आहे, त्याच्या जवळच गुरु तेगबहादुर स्मारक आहे. तिथे बांधकाम सुरू असलेल्या काही खांबांवर स्थानिक नागरिकांनी चढून तिथे लावलेले शेतकरी संघटनांचे ध्वज काढून टाकले व त्याजागी भारताचा तिरंगा ध्वज फडकविले.