छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमक, चार महिलांसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 15:29 IST2021-12-27T15:29:46+5:302021-12-27T15:29:58+5:30
तेलंगणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमक, चार महिलांसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
हैदराबाद:तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवर सोमवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत सशस्त्र दलाला मोठे यश मिळाले असून, 4 महिलांसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही घटना छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील पेसरला पडू गावातील आहे. हे ऑपरेशन तेलंगणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांचे संयुक्त ऑपरेशन होते.
तेलंगणाच्या कोत्तागुडमचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. चकमकीनंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. त्यात घटनास्थळी सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून मोठ्या प्रमाणात हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत. किस्तराम पीएस सीमेवरील जंगलात ही कारवाई झाली आहे. एसपी सुनील दत्त यांनी म्हटले की, हे तेलंगणा पोलीस, छत्तीसगढ पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे कारवाई केली.
याआधी गुरुवारी झारखंडमधील चाईबासा जिल्ह्यात पोलिसांनी पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (PLFI)चा 'एरिया कमांडर' बंधन टोप्नो याला सोगा टेकडीच्या जंगलातून शस्त्रास्त्रांसह अटक केली होती. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये नक्षली कमांडरसोबत त्यांच्या काही साथीदारांचाही पाठलाग करण्यात आला. परंतु, त्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला. अटक करण्यात आलेल्या नक्षली कमांडरवर अनेक गुन्हे दाखल आहेत.