धक्कादायक! मुलाला वर्गात लॉक करून घरी गेले शिक्षक; 'तो' खिडकीजवळ रडत राहिला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 02:27 PM2023-08-17T14:27:53+5:302023-08-17T14:28:30+5:30
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका शाळेतील शिक्षक मुलाला शाळेत बंद करून घरी गेले.
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका शाळेतील शिक्षक मुलाला शाळेत बंद करून घरी गेले. मुलाच्या रडण्याचा आवाज येताच तेथून जाणाऱ्या लोकांनी गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघड झालं. हा प्रकार मुलाच्या कुटुंबीयांना समजताच एकच गोंधळ उडाला. त्यांनी ग्रामस्थांसह शाळेला घेराव घालून घोषणाबाजी केली.
दौसा येथील रामसिंहपुरा येथील महात्मा गांधी शाळेत ही धक्कादायक घटना आहे. जिथे शाळा सुटल्यानंतर शिक्षकाने घाईघाईने इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला तो आत असतानाच बाहेरून लॉक केलं. अनेक तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. याच दरम्यान, शाळेच्या खोलीत कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत असल्याचे कोणीतरी सांगितलं
नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच ते धावतच शाळेत पोहोचले. त्यांनी पाहिलं की क्रिस कुमार मीणा हा मुलगा खिडकीजवळ बसून रडत होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला लवकरच बाहेर काढणार असल्याचं सांगितलं. मुलगा रडत असल्याचं पाहून नातेवाईकांसह ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती शाळा प्रशासन आणि पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
शाळेतील कर्मचाऱ्यांनाही परत बोलावण्यात आले. सुमारे 3 तासांनंतर मुलाला वर्ग खोलीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेकडे शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या शिक्षण विभागाचे उच्च अधिकारीही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.