८ वी ते १२ वीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करा; ‘एनसीईआरटी’ची सरकारला शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:28 PM2020-05-26T23:28:23+5:302020-05-26T23:28:41+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्हाळी सुट्यांनंतर शाळांची शैक्षणिक वर्षे कशा प्रकारे सुरू करता येतील याविषयी परिषदेचे मत मागविले होते.
नवी दिल्ली : कोरोना महामारीची परिस्थिती आटोक्यात आली व संपूर्ण देशातील ‘लॉकडाऊन’ उठविणे शक्य झाले, तर ८ वी ते १२ वीपर्यंतच्या इयत्तांचे पुढील शैक्षणिक वर्षाचे वर्ग जुलैच्या मध्यानंतर सुरू करावेत, अशी शिफारस राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी)ने केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्हाळी सुट्यांनंतर शाळांची शैक्षणिक वर्षे कशा प्रकारे सुरू करता येतील याविषयी परिषदेचे मत मागविले होते. सूत्रांनुसार परिषदेने आपल्या शिफारशींचा कच्चा मसुदा मंत्रालयास सादर केला आहे. अजून नक्की काही ठरलेले नाही व केंद्रीय गृहमंत्रालय ‘लॉकडाऊन’ व निर्बंधांसंबंधी काय निर्णय घेते, यावर शाळा पुन्हा सुरू होणे मुख्यत: अवलंबून असेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
परिषद म्हणते की, परिस्थिती पूर्ण सुरक्षित होईपर्यंत प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्तांचे (पहिली ते सातवी) वर्ग मात्र सुरू केले जाऊ नयेत. नव्या बदललेल्या परिस्थितीत वर्ग कसे घ्यावेत व ते घेताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देऊन तयारी करून घेण्यासाठी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याआधी शिक्षकांसाठी एखादा अल्पावधीचा आॅनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावा, असेही परिषदेने म्हटले आहे.
‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन
33% विद्यार्थ्यांनाच हजर राहू द्यावे, असे सूचित करण्यात आले आहे. परिस्थिती अनुकूल असेल, तर ‘ग्रीन’ व ‘आॅरेंज झोन’मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्तांचे शालेय वर्ग जुलैच्या मध्यानंतर सुरू केले जाऊ शकतील. शिवाय ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन केले आहे.