शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:32 AM2023-09-07T06:32:57+5:302023-09-07T06:33:04+5:30
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हैदराबाद : भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रख्यात गायिका मालिनी राजूरकर यांचे वृद्धापकाळामुळे बुधवारी निधन झाले. त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. गायन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळी सव्वाचार वाजता त्यांचे निधन झाले. मालिनी राजूरकर यांना देहदान करण्याची इच्छा होती. त्यानुसार उस्मानिया वैद्यकीय विद्यापीठाला त्यांचे पार्थिव वैद्यकीय अभ्यासासाठी सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय विद्या देवधर यांनी दिली. मालिनी राजूरकर यांना दोन मुली आहेत.
ख्याल आणि टप्पा गायकी हे मालिनी राजूरकर यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा जन्म राजस्थानमधील अजमेर येथे १९४१ साली झाला. त्यांनी गणित विषयात पदवी शिक्षण घेऊन तीन वर्षे अजमेर येथील सावित्री गर्ल्स हायस्कूलमध्ये त्या विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर मालिनी राजूरकर यांना संगीत क्षेत्रासाठी असलेली तीन वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली.
(वृत्तसंस्था)