अक्षरलेखनातून रेखाटला स्वच्छ भारत!
By admin | Published: October 14, 2015 12:43 AM2015-10-14T00:43:22+5:302015-10-14T00:43:22+5:30
गंगा नदीच्या घाटावर शंभर फूट लांबीचा पेपर रोल अंथरलेला, एका बाजूने हर हर गंगेच्या जयघोषात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव तर दुसऱ्या बाजूने
बनारस : गंगा नदीच्या घाटावर शंभर फूट लांबीचा पेपर रोल अंथरलेला, एका बाजूने हर हर गंगेच्या जयघोषात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव तर दुसऱ्या बाजूने मनोहर देसाई ‘वसुधैव कुटुंबकम्’चा श्लोक म्हणत अक्षरलेखन करत आहेत आणि सूर्योदयाच्या साक्षीने जमलेले भाविक घाटावर रंगलेली अक्षर दंगल स्तिमीत होऊन पाहत आहेत...
बनारस हिंदू विद्यापीठाने एका अभिनव संकल्पनेचे आयोजन केले आणि त्याला साद दिली महाराष्ट्रातील दोन सुलेखनकारांनी. ‘कलाक्षर’ या कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी या विषयावरच्या संमेलनाचे आयोजन गंगा घाटावर बनारस विद्यापीठाने आयोजित केले होते.
हे सारे चालू असताना सभोवताली जमलेले भाविक सूर्याचे मंत्र आणि आरती चढ्या आवाजात म्हणत होते.
सूर्य जसजसा वरती येऊ लागला तसेतशी अक्षरं देखील खुलून दिसू लागली.
या अनोख्या मैफिलीनंतर अच्युत पालव यांचा ‘बनारस सुबह’ या संस्थेतर्फे मानचिन्ह देऊन गौरवही करण्यात आला. या अनुभवाबद्दल बोलताना पालव म्हणाले, कॉम्प्युटरच्या युगात अक्षरलेखनाकडे जगाचा ओढा निर्माण होणे ही अभिमानाची बाब आहे.
पॅरिस येथे देखील एका नामवंत कंपनीने इंटिरियर करण्यासाठी जगातल्या ७ लिप्यांची निवड केली आहे ज्यात आपल्या देवनागरीचा समावेश आहे आणि त्यासाठी देखील आपण केलेल्या कामाची निवड होणे हा अक्षरलेखनाचा सन्मान असल्याचेही पालव यांनी यावेळी आवर्जून सांगितले. (वृत्तसंस्था)