इंदूरसह, गुजरातचे 'हे' शहर देखील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर, महाराष्ट्राचाही यादीत समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:41 PM2024-01-11T14:41:41+5:302024-01-11T14:42:47+5:30
स्वच्छता सर्वेक्षण २०२३ च्या यादीत मध्य प्रदेशातील इंदूरची निवड करण्यात आली आहे. इंदूरची सलग सातव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवड झाली आहे.
स्वच्छता सर्वेक्षण २०२३ ची यादी समोर आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळ्यात इंदूरला पुन्हा एकदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांना हा पुरस्कार दिला आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय, इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव उपस्थित होते. इंदूरसह सुरत देखील स्वच्छ शहरांच्या यादीत संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहे. मात्र, इंदूरने सलग ७व्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला आहे.
भाजप ७० चा फॉर्म्युला वापरण्याच्या तयारीत; राजनाथ सिंहांसह ५६ नेते 'आऊट' होणार
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांचा क्रमांक लागतो. स्वच्छता सर्वेक्षण २०२३ मध्ये, भोपाळ हे ५ स्टार रेटिंगसह देशातील पाचवे स्वच्छ शहर आहे. या कामगिरीनंतर भोपाळ महानगरपालिकेचे अध्यक्ष किशन सूर्यवंशी यांनी सफाई मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी सफाई मित्रांचे मिठाई देऊन अभिनंदन केले आहे. सफाई मित्रांच्या अथक परिश्रमामुळे हे स्थान मिळाले असल्याचे ते म्हणाले. लोकांच्या जागृतीमुळे याला पाचवे स्थान मिळाले आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सातव्यांदा स्वच्छता सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर आल्याबद्दल राज्याचे आणि इंदूरच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. इंदूरच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, स्वच्छता ही त्यांची सवयच झाली नाही तर आता स्वच्छता त्यांच्या विचारातही आहे.
मध्य प्रदेश पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण करत आहे. स्वच्छतेच्या या मोठ्या यशाबद्दल राज्यातील स्वच्छतेच्या कामात असलेल्या संपूर्ण टीमचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. तुमची स्वच्छतेची आवड कधीही कमी होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मध्य प्रदेश नेहमीच कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.