सफाई कर्मचारी बनला करोडपती; घरात ९ लग्झरी गाड्या, कमाईची पद्धत पाहून अधिकाऱ्यांनाही बसला धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:03 PM2024-08-16T12:03:07+5:302024-08-16T12:03:49+5:30
गोंडा जिल्ह्यातील एक सफाई कर्मचारी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक निघाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गोंडा जिल्ह्यातील एक सफाई कर्मचारी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक निघाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. या प्रकरणाची अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत असून कर्मचाऱ्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संतोषकुमार जैस्वाल असं या कर्मचाराचं नाव आहे. प्रत्यक्षात नियमांना बगल देत नगरपरिषद गोंडा येथे कार्यरत असलेला स्वच्छता कर्मचारी संतोषकुमार जैस्वाल याला प्रथम आयुक्त कार्यालयात निरीक्षक बनवून महत्त्वाचे काम देण्यात आले. या पदावर असताना संतोषकुमार जैस्वाल यानं सरकारी फायलींमध्ये फेरफार करून करोडो रुपये कमावले.
याआधी संतोषकुमार जैस्वाल हा जयस्वाल नगर कोतवाली येथे सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. सफाई कर्मचारी संतोषकुमार जैस्वाल हा आयुक्त कार्यालयात नजीर झाल्यानंतर त्याने सरकारी फायलींमध्ये फेरफार करण्यास सुरू केली. त्यामुळे त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळवली. तसंच, त्याच्याकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत.
या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर तत्कालीन आयुक्त योगेश्वर राम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीदरम्यान संतोषकुमार जैस्वाल दोषी आढळून आला. त्यानंतर त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात आले. तसंच, सदरचे तहसीलदार देवेंद्र यादव यांना जयस्वाल यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
९ लग्झरी गाड्या
चौकशीदरम्यान, संतोषकुमार जैस्वाल याच्याकडे लग्झरी गाड्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना सहाय्यक विभागीय परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. यावेळी अधिकाऱ्यानी गाड्यांची चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. संतोषकुमार जयस्वाल याच्याकडे एक नव्हे तर ९ लग्झरी गाड्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये स्विफ्ट डिझायर, एर्टिगा मारुती सुझुकी, महिंद्रा स्कॉर्पिओ, टोयोटा इनोव्हा आणि महिंद्रा झायलो यांचा समावेश आहे. याशिवाय, संतोषकुमार जैस्वाल याचा भाऊ उमाशंकर जैस्वाल यांच्या नावावर एर्टिगा मारुती सुझुकी आणि पत्नी बेबी जैस्वाल हिच्या नावावर टोयोटा इनोव्हा खरेदी केली आहे.