स्वच्छतेची ‘लक्ष्य’पूर्र्ती!

By admin | Published: October 2, 2015 04:24 AM2015-10-02T04:24:30+5:302015-10-02T04:24:30+5:30

पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियान’ या पंचवार्षिक योजनेचे पहिल्या वर्षीचे शौचालय बांधणीचे नियोजित उद्दिष्टाहून बरीच अधिक मजल मारण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला.

Cleanliness goal! | स्वच्छतेची ‘लक्ष्य’पूर्र्ती!

स्वच्छतेची ‘लक्ष्य’पूर्र्ती!

Next

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियान’ या पंचवार्षिक योजनेचे पहिल्या वर्षीचे शौचालय बांधणीचे वेळेपूर्वीच ओलांडून नियोजित उद्दिष्टाहून बरीच अधिक मजल मारण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने गुरुवारी केला. मात्र ज्या प्रमाणात गवगवा झाला ते पाहता या मोहिमेचा प्रभाव कुठे दिसलाच नाही. स्वातंत्र्यानंतरचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी नागरी प्रकल्प अशी प्रसिद्धी मिळालेल्या या योजनेला २०१९पर्यंत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेने मोठी मजल गाठावी लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदींनी स्वत: हातात झाडू घेऊन गतवर्षी गांधी जयंतीला स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. या अभियानांतर्गत केंद्र सरकारने ग्रामीण भागात ६0 लाख नवी शौचालये बांधण्याचे लक्ष्य ठरवले होते. प्रत्यक्षात वर्ष संपण्याआधीच ८१.४१ लाख शौचालये बांधून तयार आहेत. देशात सध्या दररोज ५१ हजार नवी शौचालये तयार होत आहेत, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा व मलनि:सारण (पेयजल व स्वच्छता) मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बिहार, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरयाणाने या योजनेत लक्षणीय प्रगती साधली आहे; तर उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचलसारखी काही राज्ये या आघाडीवर निर्धारित लक्ष्यापेक्षा मागे आहेत, असे मंत्रालयाची आकडेवारी सांगते.
समस्यांचा डोंगर
खुल्या जागेवर शौचाच्या जागतिक प्रमाणात भारताचा वाटा सर्वाधिक ६० टक्के आहे. प्रत्यक्षात हागणदारीमुक्ती गावांचे उद्दिष्ट गाठताना समस्यांचा डोंगर पार करावा लागणार असेच चित्र दिसत आहे. अपुरा निधी, जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या क्षमतेचा अभाव, निष्प्रभ ठरलेल्या जनजागृती मोहिमा, शौचालयांचा वापर करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यात आलेले अपयशही या घटकांत समाविष्ट आहे. शौचालयांच्या बांधणीत सरकारला अपेक्षित असलेला प्रतिसाद खासगी क्षेत्राकडून न मिळणे हेही महत्त्वाचे कारण आहे.
यंदाच्या गांधी जयंतीच्या कार्यक्रमात गतवर्षासारखा कोणताही गाजावाजा, थाटमाट अथवा बडेजाव नाही. तमाम ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे आयोजन करावे, लोकांमधे स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करावी असे मंत्रालयाने एका परिपत्रकाद्वारे कळवले आहे.
सातत्यपूर्ण जनजागृती मोहीम राबवत शौचालय वापराची संस्कृती रुजवावी लागेल; तरच स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी समुदायाला हा कार्यक्रम यशस्वी करता येईल.
- एम. रामचंद्रन,
माजी केंद्रीय नगर विकास सचिव

Web Title: Cleanliness goal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.