रस्ता मोकळा करा, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात स्थानिक आक्रमक; दिल्लीच्या सीमेवर मोठा गोंधळ
By बाळकृष्ण परब | Published: January 28, 2021 04:24 PM2021-01-28T16:24:45+5:302021-01-28T16:35:25+5:30
Farmer Protest : ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरू केला आहे.
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरू केला आहे. दिल्ली हरियाणा सीमेवर (सिंघू बॉर्डर) आज सकाळपासून स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात जमण्यास सुरुवात केली आहे. तसेच आंदोलकांनी येथील रस्ता लवकरात लवकर मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.
सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू होती. रस्ता अडवून करण्यात येत असलेल्या आंदोलनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. आंदोलकांनी शुक्रवारपर्यंत जागा रिकामी केली नाही तर आम्ही येथे हजारोंच्या संख्येने पुन्हा येऊ, असा इशारा दिला आहे. २६ जानेवारीला जे घडले ते सहन करता येण्याजोगे नाही. आतापर्यंत आम्ही यांना शेतकरी समजत होतो. मात्र आता सत्य परिस्थिती आमच्यासमोर आली आहे, असे स्थानिकांनी म्हटले आहे.
Heavy Police presence seen at Singhu border (Delhi-Haryana border) as they attempt to barricade a portion of the road in order to restrict the protesters from coming to one side of the road from the other side. The protesters are opposing the barricading being done by Police. pic.twitter.com/d3Yjx7snXk
— ANI (@ANI) January 28, 2021
सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये स्थानिक दुकानदारांचाही समावेश आहे. सिंघू बॉर्डर रिकामी करा, अशी मागणी करत त्यांनी आंदोलन केले आहे. त्यांनी तिरंगाही सोबत घेतला आहे. सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. या ठिकाणची वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे दुकानदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, बुधवारी रेवाडीमध्ये अनेक गावांतील लोक पंचायतींचे आयोजन केल्यानंतर आंदोलकांजवळ पोहोचले होते. आंदोलक आणि स्थानिक आमने-सामने आल्याने पोलीसही चिंतेत पडले होते. मात्र स्थानिकांचे पारडे जड दिसू लागल्यानंतर रस्ता अडवून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला आहे.
२६ जानेवारी रोजी आयोजित ट्रॅक्टर रॅलीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शेकतरी आंदोलनाप्रति स्थानिक तसेच सर्वसामान्यांमध्ये असलेली सहानूभुती कमी झाली होती. त्यामुळे आता स्थानिक रहिवाशांकडूनही दिल्लीच्या सीमेवर रस्ता अडवून आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना विरोध होत आहे.