फाशीची शिक्षा बंद करा - वरुण गांधी
By admin | Published: August 2, 2015 07:34 PM2015-08-02T19:34:26+5:302015-08-02T19:34:26+5:30
याकूब मेमनच्या फाशीविरोधात काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध दर्शवला असतानाच आता भाजपा नेते व खासदार वरुण गांधी यांनीदेखील फाशीच्या शिक्षेला विरोध दर्शवला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - याकूब मेमनच्या फाशीविरोधात काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध दर्शवला असतानाच आता भाजपा नेते व खासदार वरुण गांधी यांनीदेखील फाशीच्या शिक्षेला विरोध दर्शवला आहे. फाशीची शिक्षा व जल्लाद या गोष्टी भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी विसंगत बाब असून या कायद्यात बदल करण्याची गरज आहे असे परखड मत वरुण गांधी यांनी मांडले आहे. सत्ताधारी पक्षातील खासदाराच्या या विधानाने भाजपाची मात्र कोंडी झाली आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी याकूब मेमनला फाशी दिल्याच्या पार्श्वभूमीवर वरुण गांधी यांनी एका इंग्रजी मासिकासाठी लेख लिहीला असून यात त्यांनी फाशीच्या शिक्षेला विरोध दर्शवला. भारतात फाशीची शिक्षा झालेले ९४ टक्के गुन्हेगार हे दलित किंवा अल्पसंख्यांक समाजातील होते. यावरुन मागासवर्गीयांना पुरेशा कायदेशीर सुविधा उपलब्ध होत नाहीत हे स्पष्ट होते. संस्थेच्या पक्षपातीमुळे फाशीच्या शिक्षेचे सामाजिक व आर्थिक पूर्वग्रहदेखील असू शकतात असा दावाही त्यांनी या लेखात केला आहे. मृत्यूदंडाची शिक्षा गुन्हे रोखण्यात अपयशी ठरली असून ही शिक्षा व गुन्ह्यांवर रोख लावणे यात काहीच संबंध नाही असे त्यांनी नमूद केले. फाशीची शिक्षा असलेल्या जगातील ५८ देशांमध्ये भारताचा समावेश असून आता सरकारने बदलत्या जागतिक दृष्टीकोनातून या शिक्षेवर पुनर्विचार केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
याकूबच्या फाशीविरोधातील पत्रावर शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वाक्षरी केल्यानंतर भाजपाची कोंडी झाली होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वतः शत्रुघ्न सिन्हांमुळे भाजपाची नाचक्की झाली असे विधान केले होते. यापार्श्वभूमीवर वरुण गांधींदेखील पक्षविरोधी भूमिका घेतली आहे.