'पंडित नेहरुंची परंपरा बंद करा, जम्मू आणि काश्मीरचा मुख्यमंत्री हिंदूच असावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:46 PM2018-07-09T17:46:14+5:302018-07-09T17:48:38+5:30
जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपकडून सरकार बनविण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे विधान अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी हिंदू व्यक्ती असावी. पीडीपीजवळ जर कुणी हिंदू किंवा शीख व्यक्ती असेल, तर आम्ही त्यांस जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी बसवू, असे वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या स्वामींच्या या वक्तव्यावरुन नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. कारण, या वक्तव्याला स्वामी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा संदर्भ दिला आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर स्पष्ट बहुमत सिद्ध न झाल्याने तिथे राज्यपाल शासन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये कुणाचेही सरकार अस्तित्वात नसून मुख्यमंत्रीपदही रिकामेच आहे. याबाबत बोलताना भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे हिंदू मुख्यमंत्री बनविण्यात यावा. हिंदू किवा शीख मुख्यमंत्री बनविण्यासाठी आम्ही पाठिंबा देऊ, असे स्वामींनी म्हटले. तसेच माजी पंतप्रधान पंडित नेहरुंनी जम्मू आणि काश्मीरमध्ये मुस्लीम मुख्यमंत्री बनविण्याची परंपरा लादली असून ते आम्ही खपवून घेणार नसल्याचेही स्वामी म्हणाले. दरम्यान, स्वामींच्या या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होऊ शकतो. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षातील काही नाराज आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सरकार बनविण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे.