विशेष दर्जासाठी बंद, आंध्रात जनजीवन विस्कळीत
By admin | Published: August 3, 2016 06:10 AM2016-08-03T06:10:02+5:302016-08-03T06:10:02+5:30
आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्य विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले.
विजवाडा : आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्य विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे राज्यातील जनजीवन मंगळवारी विस्कळीत झाले. शैक्षणिक संस्थांसह दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठानेही बंद होती. काँग्रेसने तसेच डाव्या पक्षांनीही या लाक्षणिक बंदला पाठिंबा दिला होता. याच मागणीसाठी या पक्षांनी लोकसभेतही जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.
आंध्र प्रदेशातील सर्वपक्षीय खासदारांच्या एकजुटीमुळे केंद्र सरकारला नंतर काहीसे झुकावे लागले. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याबाबत आम्ही नक्की विचार करू, असे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांना द्यावे लागले.
संपूर्ण आंध्र प्रदेशात रास्ता रोको करून राज्य परिवहन महामंडळाच्या बस अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची राज्यात विविध ठिकाणी धरपकड करण्यात आली. बसगाड्यांचे नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने बससेवा तात्पुरती स्थगित केली आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून, बँका, व्यावसायिक प्रतिष्ठानेही बंद होती. विजयवाडा शहरात वायएसआर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. हे कार्यकर्ते बसस्थानकासमोर रास्ता रोको करून बससेवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, पोन्नरू येथील तेलुगू देसम पार्टीचे आमदार आचार्य एन.जी. रंगा यांनी पुतळ्यासमोर एकदिवसीय दीक्षा आंदोलन सुरू केले आहे. केंद्रातील भाजपा प्रणीत सरकारने आपल्या आश्वासनाचा आदर करून आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. अतार्किक द्विभाजनामुळे मोठी हानी झाली असल्यामुळे आंध्र प्रदेशला मदत करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, असे आमदार नरेंद्र म्हणाले.
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगू देसम आणि वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार घोषणाबाजी करून दोन वेळा सभागृहाचे कामकाज बंद पाडले. आंध्रातील सदस्यांच्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्षांचाही पारा चढला. घोषणाबाजीमुळे तुमची मागणी पूर्ण होणार नाही, असे त्यांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सुनावले. तेलुगू देसमचे सदस्य डोक्याला पिवळा रुमाल बांधून पारंपरिक वेषभूषेत सभागृहात दाखल झाले. त्यांच्या हातात बॅनर्स होते. या गोंधळाने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व्यथित झाल्या होत्या. तुमचे वागणे ठीक नाही, असे गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सुनावले. (वृत्तसंस्था)
>तेलुगू देसम पक्ष नाराज
आंध्र प्रदेशचे द्विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करण्यात आल्यानंतर आंध्रला मिळायला हवा तेवढा निधी नरेंद्र मोदी सरकारने दिला नसल्याने तेलुगू देसम पक्ष नाराज आहे.
या मुद्द्यावरून भाजपा आणि तेलुगू देसममधील दरी एवढी वाढली आहे की, एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष रालोआतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.