कपड्यांचा जॉबवर्क; जीएसटी दरात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 01:02 AM2017-08-06T01:02:50+5:302017-08-06T01:02:55+5:30
ट्रॅक्टरच्या काही सुट्या भागांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे, तसेच कपड्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या जॉब वर्कवरील जीएसटी दरही १८ टक्क्यांवरून
नवी दिल्ली : ट्रॅक्टरच्या काही सुट्या भागांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे, तसेच कपड्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या जॉब वर्कवरील जीएसटी दरही १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. सर्व राज्यांचे वित्तमंत्री जीएसटी परिषदेचे सदस्य आहेत. आजच्या बैठकीत ई-वे बिलालाही अंतिम स्वरूप देण्यात आले. ई-वे बिलानुसार, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची विक्रीच्या उद्देशाने १० किमीपेक्षा जास्त अंतरावर वाहतूक करायची असल्यास त्याची नोंदणी करणे बंधनकारक असेल.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जेटली यांनी सांगितले की, ई-वे बिल लवकरच अधिसूचित केले जाईल. जीएसटीमधून सूट असलेल्या वस्तूंना मात्र ई-वे बिलाचा नियम लागू होणार नाही. जीएसटीअंतर्गत वर्क कॉन्ट्रक्टस्वर १२ टक्के कर लागेल. तसेच त्यावर इनपुट टॅक्स क्रेडिटही मिळेल.जेटली यांनी सांगितले की, ७१ लाख केंद्रीय आणि राज्य पातळीवरील करदाते जीएसटीमध्ये स्थलांतरित झाले आहेत. या करदात्यांनी जीएसटी नोंदणी पूर्ण केली आहे. आणखी १५.६७ लाख नवे नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत.
जीएसटीमुळे कमी झालेल्या कराचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जेटली यांनी यावेळी केले. तसे न करणाºया व्यावसायिक आणि उत्पादकांविरुद्ध नफेखोरीविरोधी नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जेटली यांनी याप्रसंगी दिला. जीएसटी परिषदेची पुढील बैठक ९ सप्टेंबर रोजी हैदराबादेत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.