कपड्यांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढणार?; शांघाय लॉकडाऊन, अडकला कच्चा माल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 08:34 AM2022-06-01T08:34:58+5:302022-06-01T08:35:06+5:30
यंदा हिवाळ्यातील कपड्यांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.
नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूच्या नव्या साथीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चीनच्या शांघाय शहरात मोठ्या प्रमाणात कच्चा माल अडकून पडला असून, त्याचा परिणाम म्हणून भारतातील होजिअरी उद्योग जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे हिवाळ्यात लागणाऱ्या कपड्यांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
लुधियाना निटवेयर ॲपरल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे प्रमुख सुदर्शन जैन यांनी सांगितले की, शांघायमधील बहुतांश युनिट बंद आहेत. मार्चमधील बुकिंगचा मालही अद्याप आम्हाला मिळू शकलेला नाही. हा माल जुलैमध्ये मिळेल, असे आता सांगितले जात आहे. त्यामुळे उत्पादन प्रचंड मंदावेल आणि किमती वाढवाव्या लागतील.
ड्यूक फॅशन्सचे चेअरमन कोमल जैन यांनी सांगितले की, यंदा हिवाळ्यातील कपड्यांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.
ऑक्टेव ॲपेरल्सचे संचालक बलबीरकुमार यांनी सांगितले की, कच्चा माल शांघायमधून येतो. आपल्याकडे तयारच होत नाही. त्यामुळे प्रतीक्षेशिवाय आपल्या हातात काहीच नाही. जूनअखेरपर्यंत काही प्रमाणात पुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. याच आशेवर उद्योग सध्या तग धरून बसला आहे.
हा कच्चा माल येताे चीनमधून
चीनमधून आयात होणाऱ्या कच्च्या मालात वूलन फॅब्रिक्सचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय जॅकेटस्च्या ॲक्सेसरीजपैकी अंडरलाइनिंग, पॉलिफिल्स, बटन, झिप यांचीही चीनमधून आयात होते. हिवाळ्याच्या हंगामासाठी या वस्तूंची वार्षिक आयात ५०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
नेमके कारण काय?
हिवाळ्यात वापरण्यात येणाऱ्या होजिअरी कपड्यांतील ८० टक्के कच्चा माल चीनमधून आयात केला जातो. शांघाय शहर मागील अडीच महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गरम कपड्यांची टंचाई निर्माण होऊन किमती वाढण्याची शक्यता आहे. देशभरात विकल्या जाणाऱ्या हिवाळ्यातील कपड्यांपैकी ७० टक्के कपडे लुधियाना येथे बनतात. शांघाय शहरातील लॉकडाऊनमुळे ऑर्डरच्या परिपूर्तीसाठी ३ ते ५ महिन्यांचा उशीर होत आहे.